लातूर : सत्ताधाऱ्यांनी अनेक घरे फोडली त्यात लातूर अपवाद राहील असे वाटले होते. पण लातूरातील ‘देवघर’ही फोडले. मात्र ‘देव’ आपल्या सोबत आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी लातूरच्या निवडणुकीमध्ये देव आणि देवघर ही चर्चा केंद्रस्थानी राहील याची काळजी घेतल्याचे मानले जाते. शिवराज पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या प्रक्रियेवर अमित देशमुख यांनी हे वक्तव्य केले याचे कारण शिवराज पाटील यांच्या निवासस्थानाचे नाव ‘ देवघर’ आहे. यातील देव म्हणजे चाकुरकर काँग्रेससोबत असल्याचे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतीस्पर्धी उमेदवार अर्चना पाटील यांचे नाव पुढे आले तर चर्चा ‘देव’आणि ‘देवघर’ अशी व्हावी याची तजवीज केल्याचे मानले जाते. शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश झाल्यानंतर त्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार अमित देशमुख व डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असा सामना होईल अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘देव’ आणि ‘देवघर’ अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लातूरात ‘न खात्या देवाला नैवेद्य’, ‘देखल्या देवा दंडवत’, ‘पावला तर देव नाही तर …, ‘मनी नाही भाव देवा मला पाव’ अशा म्हणींची रेलचेल आहे. यातील शेवटची म्हण भाजपचे नेते अमित देशमुख यांच्यासाठी वापरत आहेत. हेही वाचा : Himanta Biswa Sarma : भूमी व खत जिहादनंतर आता ‘पूर जिहाद’, आसामच्या मुख्यमंत्र्यांची मुसलमानांवर आगपाखड; गुवाहाटीतील पुरावरून… विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांचे ‘सख्य’ लातूरामध्ये नेहमी चर्चेत विषय . शिवराज पाटील चाकूरकरांनी विलासरावांना राजकारणात आणले. विलासराव देशमुख यांनीच तीस वर्षांपूर्वी लातूर नगर परिषदेच्या निवडणुक निमित्ताने राजीव गांधी मंचाची स्थापना करत चाकुरकरांच्या विरोधात अघोषित बंड पुकारले. लातूर नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही राजीव मंचचा नगराध्यक्ष केला त्यानंतर बसवेश्वर पुतळ्याच्या वादातून १९९५ साली विलासराव देशमुख यांचा पराभव झाला. त्याचा वचपा देशमुख समर्थकानी गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने २००४ साली काढला आणि त्यातून देशमुख विरुद्ध चाकूरकर असे चित्र राजकीय पटलावर नेहमी रंगवले गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लातूर लोकसभेची जागा पुन्हा खेचून आणली.यामध्ये ‘ लिंगायत ’ मतांचा मोठा आधार होता. ही मते पारंपरिकपणे शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषेकडे जाणार की नव्याने निवडून आलेल्या खासदार शिवाजी काळगे यांच्यामुळे अमित देशमुख यांच्याकडे वळणार यावर विधानसभेची गणिते अवलंबून असणार आहेत. चाकुरकरच्या सुनबाई भाजपात गेल्याची घटना देशमुख यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यामुळे देव आपल्या सोबत असल्याची चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे ‘ देवा’ ला देवपण कसे देणार याची चर्चा लातूरमध्ये रंगू लागली आहे.