प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड होता. काँग्रेसच्या गढीचा टवका देखील निघणार नाही, अशी भक्कम स्थिती. मात्र, ही गढी आता ढासळते आहे. जिल्ह्यातील सहा मतदार संघापैकी लातूर शहरामध्ये अमित देशमुख आणि ग्रामीणमध्ये धीरज देशमुख असे विलासरावांचे दोन्ही सुपुत्र आमदार. उर्वरित चार मतदार संघात काँग्रेस असून नसल्यासारखीच. अलीकडेच काँग्रेसच्या मजबुतीसाठी संपर्क प्रमुख नेमले खरे मात्र या घटनेचे वर्णन ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी…’ असेच केले जात आहे.

या वर्णनाचा एक कलात्मक संदर्भ आवर्जून चर्चेत आहे. दिवंगत श्रीराम गोजमगुंडे हे नाट्य चळवळीतील अग्रेसर तसे काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांनी बसवलेल्या व गाजलेल्या नाटकाचे नाव ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी…’. लातूरचे विद्यमान महापौर विक्रांत गोजमगुंडे हे त्यांचे पुतणे. त्यांची नियुक्ती काँग्रेसची ताकद तुलनेने कमी असणाऱ्या अहमदपूर मतदार संघासाठी करण्यात आली. तर लातूर महापालिकेतील विरोधी पक्ष नेते ॲड. दीपक सूळ यांच्याकडे निलंगा मतदार संघाचे प्रभारी पद देण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख दोन मतदार संघात ‘सावली’त वाढलेल्या या कार्यकर्त्यांची अवस्था या नाटकाच्या नावासारखी झाली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकेकाळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते. उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूर वेगळा झाल्यानंतर लातूरचे नेतृत्व विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा दिग्गजांनी केले. त्यामुळे राज्यात व देशात लातूरच्या काँग्रेसचा दबदबा होता. आता चित्र धूसर झाले असून ‘गेले ते दिन’ अशी स्थिती आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपरिषद अशा सर्वच ठिकाणी काँग्रेसची पीछेहाट होऊन भाजपाची पकड मजबूत झाली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी लातूर शहर व ग्रामीण हे दोनच विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे आहेत. या दोन्ही ठिकाणी विलासरावांची दोन मुले आमदार आहेत. उर्वरित चार मतदार संघांपैकी दोन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. लातूर तालुका वगळता औसा, निलंगा, उदगीर व अहमदपूर तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होते आहे. काँग्रेस पक्षाची एकूण देशभर पीछेहाट होते आहे, त्याचेच प्रतिबिंब लातूर जिल्ह्यातही पाहायला मिळते.

निलंगा काँग्रेसचा गड होता. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा दबदबा होता. मात्र, निलंग्यातही काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. अहमदपूर तालुक्यात काँग्रेस तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तीच अवस्था उदगीर व औसा तालुक्याची आहे. केवळ दोन मतदार संघात ताकद असतानाही पालकमंत्री अमित देशमुख यांची निवडणुकीतील भाषा स्वबळाची आहे. निवडणूक लागली की त्यात तडजोडी केल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस देशमुख घराण्यापुरतीच मयादित अशी अवस्था आहे.

काँग्रेस देशमुख घराण्यापुरती

लातूर शहर व लातूर ग्रामीण या मतदार संघामध्ये काँग्रेसचे प्रभुत्व असले, तरी ही काँग्रेस केवळ देशमुख घराण्यापुरती सीमित आहे. या घराण्याव्यतिरिक्त काँग्रेसचे जिल्ह्यात अस्तित्व नाही. शह-काटशहाच्या राजकारणात काँग्रेसच्या मंडळींनी अन्य नेतृत्वाचा उदय होऊ दिला नाही. त्याचे पंख छाटण्याचे काम केले त्याचीच ही परिणती असल्याची प्रतिक्रिया राजकीय अभ्यासक ॲड. गोपाळ बुरबुरे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur congress remain limited to deshmukh family in other part of latur congress is not doing great job
First published on: 16-05-2022 at 10:05 IST