Premium

जयंत पाटील गटाचे नेते, कार्यकर्त्यांना अजितदादांचे आकर्षण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सहा महिन्यांनी सांगलीत शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या गटाला गळती लागली असून अनेक मोहरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील होत असल्याचे दिसत आहे.

party workers of Jayant Patil group
जयंत पाटील गटाचे नेते, कार्यकर्त्यांना अजितदादांचे आकर्षण

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सहा महिन्यांनी सांगलीत शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या गटाला गळती लागली असून अनेक मोहरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील होत असल्याचे दिसत आहे. मुदत संपलेल्या महापालिकेत १५ सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांमधील काही जण उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटात जाण्यास उत्सुक आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील आमदार पाटील यांच्या गटाला सावरण्यासाठी आता सत्तेची उबच कामी येणार हे स्पष्ट आहे. माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादीच्या दादा गटात प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील यांच्या गटात जुन्या पदाधिकार्‍याबाबत असलेल्या नाराजीमुळेच खदखद असल्याचे दादा गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्याकर जगदाळे यांनी स्पष्ट सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीतील फुटीनंतर सांगली जिल्ह्यात प्रारंभीच्या काळात केवळ माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी चिरंजीव नगरसेवक अतहर नायकवडी व सातत्याने पक्षातून होणारी कोंडी सहन करणारे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दादा गटात सहभागी होण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर मुंबईत जाऊन माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे आणि विट्याचे वैभव पाटील यांनी दादासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. या दोघांनाही शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष ही पदे देऊन अजितदादांनी ताकद देण्याचे मान्य करीत पक्ष विस्तार करण्याचे लक्ष्य या दोघांपुढे ठेवले. अप्रत्यक्ष राष्ट्रवादीतील पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार जयंत पाटील यांना चेकमेट करणे हाच उद्देश त्यांचा दिसतो. यातून या गटाच्या राष्ट्रवादीची बांधणी करण्याची जबाबदारी अजितदादांनी स्वत:कडे घेतली असून यासाठी शिलेदार ताज्या दमाचे नियुक्त करून या शिलेदारामार्फत आमदार पाटील यांच्या गडाला खिंडार पाडण्याचे मनसुबे दिसत आहेत.

हेही वाचा – चर्चेतील चेहरा : रेवंत रेड्डी यांचे स्वप्न अखेर साकार झाले…

सांगली शहरात आमदार पाटील या गटाचे म्होरके म्हणून शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व युवा शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार ही दोनच नावे प्रामुख्याने पुढे येत राहिली. बजाज यांच्या कार्यपद्धतीबाबत अन्य पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमदार पाटील यांच्या गटात खदखद वाढतच गेली. याचीच परिणीती आज गटात मोजकेच शिलेदार उरतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. बजाज यांच्यासोबत दोन-तीन माजी नगरसेवक वगळता अन्य माजी सदस्यांचा राबता कमी झाला आहे. आता निवडणुकाही नसल्यामुळे कदाचित हा राबता कमी झाला असला तरी नव्याने या गटात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांची संख्याही तुरळक असून पक्षापुढे कोणताही कार्यक्रम सध्या दिसत नाही. कार्यकर्ते संघटित ठेवण्यासाठी मासिक बैठक होते पण या बैठकीत उपस्थित राहणारे चेहरे नेहमीचेच असल्याचे आढळून येते. भाकरी वेळेत फिरवली नाही तर करपते तीच परिस्थिती आमदार पाटील यांच्या गटाची झाली आहे.

जिल्ह्यात असलेली वसंतदादा गटाची ताकद कमी करण्यासाठी आमदार पाटील यांनी जी रणनीती अवलंबली यामुळेच जिल्ह्यात भाजपचे स्थान बळकट झाले. एकेकाळी भाजपला जयंत जनता पार्टी जेजीपी या नावाने उपरोधाने संबोधले जात होते. आज भाजपाचा जिल्ह्यात विस्तार झाला असून आघाडी करूनही राजधर्म न पाळण्याचे परिणाम या गटाला भोगावे लागत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना शिलेदार कोणाचा प्रचार करीत होते यावरून भाजपला ताकद कशी मिळत होती हे लक्षात येते.

हेही वाचा – शिवसेनेच्या घटनेत मुख्यनेता पद आहेच कुठे, ठाकरे गटाचे शिंदेंच्या नेतेपदास आव्हान; सुट्टीच्या दिवशीही अपात्रतेवर सुनावणी

आता सांगली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात आमदार पाटील यांच्या गटाची ताकद कमी करण्यासाठी हरेक प्रयत्न दादा गटाकडून होणार हे स्पष्ट आहे. आज जरी विधानसभेतील तीनही सदस्य आमदार पाटील यांच्याबरोबर असले तरी मनापासून किती आहेत हाही संशोधनाचा विषय ठरणारा आहे. यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीतील दोन गटांत सुरू राहणारा सत्तासंघर्ष केवळ राष्ट्रवादीलाच नुकसानकारक नसेल तर इंडिया आघाडीलाही हानी पोहोचविणारा ठरेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leader and party workers of jayant patil group have attraction towards ajit pawar print politics news ssb

First published on: 10-12-2023 at 11:43 IST
Next Story
चर्चेतील चेहरा : रेवंत रेड्डी यांचे स्वप्न अखेर साकार झाले…