MLA Sachin Kalyanshetti in Akkalkot Assembly Constituency : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे तीर्थक्षेत्र नकाशावर आलेल्या अक्कलकोटमध्ये विकासाची गंगा अद्यापही पूर्णपणे अवतरलेली नाही. आतापर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत उजनीचे पाणी, अक्कलकोट शहर पाणीपुरवठा, उद्योग प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास असे पारंपरिक न सुटलेले प्रश्न चर्चेत असतात. मात्र, त्याहीपेक्षा जातीय गणिते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. त्यामुळे भाजपचे विद्यामान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासाठी यंदाही लिंगायत मतांची साथ महत्त्वाची ठरू शकते.
संपूर्ण अक्कलकोट तालुका आणि शेजारच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुस्ती आणि वळसंग या तीन महसूल मंडळांचा समावेश असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लिंगायत समाजाच्या पाठोपाठ मुस्लीम, धनगर, दलित आणि मराठा अशी क्रमवारी दिसून येते. यामध्ये सर्वाधिक असलेला वीरशैव लिंगायत समाज काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
१९५२ पासून ते १९९० पर्यंत (१९७८ चा अपवाद वगळता) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचा आमदार निवडून गेला होता. १९९५ साली बदल होऊन प्रथमच भाजपचे बाबासाहेब तानवडे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. परंतु अल्पावधीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. नंतर पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. २००९ साली रक्तरंजित राजकारणामुळे अक्कलकोटची विधानसभा निवडणूक गाजली आणि भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांनी बाजी मारली. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे १९९७ पासून असलेले वर्चस्व २०१९ साली मोदी लाटेत भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मोडीत काढले होते.
हेही वाचा >>> राज्य सरकारचे धोरण उद्योगांना मारक! आदित्य ठाकरे यांचे टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रे यांच्यावर मात करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचप्रमाणे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा अनेक वर्षे बंद असलेला श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालू करून दाखवत पाटील कुटुंबीयांना आपल्याकडे वळवून घेतले. मात्र भाजपअंतर्गत दिवंगत माजी आमदार बाबासाहेब तानवडे कुटुंबीयांसह कुरनूरचे बाळासाहेब मोरे, बसलिंग खेडगी आदी जुन्या मंडळींची नाराजी ओढवून घेतली आहे. पक्षांतर्गत राजकारणात आमदार कल्याणशेट्टी यांचे विरोधक हे सोलापुरातील स्वपक्षीय आमदार विजयकुमार देशमुख यांचे पाठीराखे समजले जातात. सोलापूर लोकसभा निवडणुकीत अक्कलकोटमधून मागील २०१९ च्या तुलनेत अत्यल्प अशी ९२९७ एवढ्याच मतांची आघाडी भाजपला मिळाली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणशेट्टी यांची पक्षाकडून उमेदवारी ही निश्चित मानली जाते. मतदारसंघातील जातीय समीकरणे, केलेली विकासकामे यांचा धडाका पाहता त्यांची बाजू भक्कमही आहे. याउलट, दुसरीकडे काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचा प्रभाव पूर्वीच्या मानाने ओसरत असल्यामुळे म्हेत्रे यांच्या पुढची आव्हाने कठीण झाली आहेत.
म्हेत्रेच की अन्य कोण?
म्हेत्रे यांना पर्याय म्हणून दिवंगत माजी आमदार महादेव पाटील यांचे पुत्र मल्लिकार्जुन पाटील यांचे नाव पुढे आणले जात आहे. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निष्ठावंत मानले जातात. याशिवाय वीरशैव लिंगायत समाजातील नेते, सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनाही अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून गळ घातली जाऊ शकते. त्या अनुषंगाने माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी धर्मराज काडादी यांची घेतलेली भेट आणि त्यांच्याशी केलेली खलबते अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांशी निगडित असल्याचे बोलले जाते.
© The Indian Express (P) Ltd