चंद्रपूर : दारूबंदीचा निर्णय भाजपसाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरला आहे. राज्यातील युती शासनाने जिल्ह्यात दारूबंदी केली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ती उठवली. मात्र या मुद्याचा निवडणुकीत पद्धतशीर वापर केला जात असून त्याचा फटका २०१९ लोकसभा व विधानसभा तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला.

श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी यांच्या आंदोलनानंतर युतीची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी भाजपला राजकीय तोटा सहन करावा लागला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट असताना चंद्रपू- वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन्ही विधानसभा मतदारसंघ येतात. तेथे दारूबंदी नव्हती. त्या दोन्ही ठिकाणी अहिर यांना अनुक्रमे २ हजार व ५९ हजारांची आघाडी मिळाली होती. बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा व राजुरा या चार विधानसभा मतदारसंघात अहिर पिछाडीवर होते. या निवडणुकीत दारू विरुद्ध दूध असा प्रचार केला गेला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर ४५ हजार मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा…तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

अहिर यांच्या पराभवाच्या अनेक कारणांपैकी दारूबंदी हे प्रमुख कारण होते, असे अहिर आजही मान्य करतात. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व चिमूर विधानसभा मतदारसंघात कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया हे दोन भाजप आमदार निवडून आले. पण वरोरा, राजुरा, ब्रम्हपुरी व चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता.

हेही वाचा…कोल्हापुरात ‘गादी’ला घेरण्याची रणनीती विरोधकांवरच उलटली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव झाला. या निवडणुकीतही दारूबंदीचा मुद्दा काँग्रेसकडून प्रचारात आणला गेला होता. मुनगंटीवार निवडून आले तर दारूबंदी करतील अशी चर्चा होती. त्याचा मुनगंटीवार यांना फटका बसला. विशेष म्हणजे, या जिल्ह्यातील दारूबंदी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने उठली. काँग्रेसने दारूबंदी उठवली तर भाजपने दारूबंदी केली असा जाणीवपूर्वक प्रचार दारूविक्रेते व दारू पिणाऱ्यांकडून करण्यात आला. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांकडून मुद्दाम दारूविक्रेत्यांना दारूबंदी करू, बियर बार बंद करू, अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. यामुळे स्थानिक दारूविक्रेते भाजपवर नाराज होते. भाजपा सोडून कुणालाही मतदान करा, असा संदेश दिला जात होता. याचा फटका भाजपला बसलेला आहे. दारूबंदीच्या निर्णयामुळे महिलांची मते भाजपला मिळणार असा एक मतप्रवाह होता. मात्र तसेही झाले नाही. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीतही दारूबंदीचा विषय भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.