जयेश सामंत, लोकसत्ता ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा मुख्यमंत्र्यांपुढेच प्रश्नांची भलीमोठी मालिका उभी ठाकल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील बंडानंतर येथील खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहीले. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांना लोकसभेसाठी नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. लोकसभा प्रवास, भेटीगाठी, असे उपक्रम राबवत भाजप ठाण्यासाठी आग्रह धरत असताना कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे कायम राहील यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे असे चित्रही उभे केले जात आहे. ठाणे आणि शेजारचा कल्याण यापैकी एक मतदारसंघ जरी भाजपच्या ताब्यात गेला तर मुख्यमंत्री दिल्लीपुढे झुकले या विरोधकांच्या टिकेला आणखी धार येईल हे स्पष्टच आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ स्वत:च्या पक्षाकडे राखायचे आणि ठाण्यात तोडीस तोड उमेदवार शोधायचा असे आव्हान यावेळी मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. हेही वाचा >>> श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप, सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड युतीचे प्रभावक्षेत्र ठाणे लोकसभा मतदारसंघ पुर्वीपासून भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये या मुळ मतदारसंघाचे विभाजन झाले आणि कल्याण हा नवा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर या तीन शहरांमधील सहा विधानसभा मतदारसंघांचा ठाणे हा नवा लोकसभा मतदारसंघ तयार झाला. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजीव नाईक निवडून आले. शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाप्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव नवी मुंबईतील नेते विजय चौगुले यांना दिलेली उमेदवारी पक्षाच्या अंगलट आली होती. शिवसेनेला ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या प्रभावक्षेत्रातील तीन विधानसभा मतदारसंघात अपेक्षीत आघाडी घेता आली नव्हती. या चुकीमुळे ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी स्थानिक नेत्यांवर कमालीचे नाराज झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेने ही चूक सुधारली आणि ठाणेकर असलेले राजन विचारे यांना रिंगणात उतरविले. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विचारे मोठया मताधिक्याने त्यावेळी विजयी झाले. २०१९ मध्येही ही स्थिती कायम राहीली. राजकीय परिस्थितीचा वेळीच अंदाज आल्याने संजीव नाईक यांनी या निवडणूकीपासून स्वत:ला दूर ठेवले. त्यावेळी विचारे यांच्याविरोधात आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीने रिंगणात उतरविले. मोदी लाटेत विचारे सलग दुसऱ्यांचा मोठया मताधिक्याने विजयी झाले. हेही वाचा >>> पंजाबमध्ये ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढल्यास ‘इंडिया आघाडी’ला फायदा? काय सांगते २०२२ च्या निवडणुकीची आकडेवारी? वाचा… मुख्यमंत्र्यांपुढे भाजपचे आव्हान शिवसेना आणि भाजप महायुतीसाठी राज्यातील सुरक्षित मतदारसंघापैकी एक असलेल्या ठाण्याची राजकीय गणिते यंदा मात्र रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातील मीरा-भाईदर आणि नवी मुंबईत भाजपची ताकद मोठी आहे. या शहरांमध्ये बहुभाषिक मतदारांचा भरणा असल्याने २०१४ नंतर येथून भाजप उमेदवारांना भरभरुन मतदान होते . या शहरांचे बदलते भूराजकीय स्वरूप पाहून गणेश नाईकांसारखे एकेकाळचे शरद पवारनिष्ठ नेते भाजपवासी झाले. नवी मुंबईत गणेश नाईक, मिरा-भाईदरमधील जैन, गुजराती हक्काचा मतदार तर ठाणे शहरातील पक्षाची वाढती ताकद पाहून गेल्या काही वर्षापासून या लोकसभेवर भाजपने दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे ज्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातून निवडून येतात तो भाग याच लोकसभा मतदारसंघात मोडतो. भाजपचे माजी खासदार डाॅ.विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक यांनी या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या नावाची चर्चाही भाजपकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शिवसेनाच लढवणार अशी भूमिका मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मांडली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमीत्त शुभेच्छा देणारे म्हस्के यांचे फलक मध्यंतरी नवी मुंबई, मीरा भाईदरमध्ये लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पक्षातून म्हस्के यांच्या नावाची जोरात चर्चा सुरु झाली. ठाणे, कल्याण यापैकी एक जरी मतदारसंघ भाजपला सोडावा लागला तर मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधकांच्या हाती आयता मुद्दा लागेल. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे असणार आहेत. २०१९च्या निवडणुकीतील मते राजन विचारे (शिवसेना ) : ७,४०, ९६९ आनंद परांजपे ( राष्ट्रवादी काँग्रेस) : ३,२८,८२४