गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा दरवर्षी प्रमाणे वादळी ठरली. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेकडे नजरा वेधल्या गेल्या. प्रतिवर्षाप्रमाणे बँकेचे अध्यक्ष, पालकमंत्री हसन मुश्रीफ नेहमीच्या पद्धतीने उपस्थित झडनभर प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देत राहिले. याचवेळी एका संस्थेच्या सभासदाने जुन्या कर्जमाफी वंचित राहिलेल्या नियमित कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी अजूनही कसे वंचित राहिले आहेत याचा पाढा वाचला. सत्तेत नसल्याने हा प्रश्न सोडवण्यात अडचणी येतात असे उत्तर यापूर्वी दिले जात असे. तोच धाहा पडकूडन आता तुम्ही सत्तेत आहात; जुने कारण देवू नका, प्रश्न मार्गी लावा, असे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावले. हसन मुश्रीफ यांनीही सावरून घेत ‘यापुढे असे होणार नाही. याचवर्षी हा प्रश्न निश्चितपणे सोडवू’, असे आश्वस्त करीत वेळ मारून नेली.

 एक हत्ती आणि सात आंधळे !

महानुभव साहित्यामध्ये एक हत्ती आणि सात आंधळे यांची कथा सांगितली आहे. सात आंधळे हत्ती पाहण्यास गेल्यानंतर हत्ती कसा आहे याचे वर्णन करताना जो तो जसा हत्ती हाताला भासला तसा हत्ती असल्याचे सांगतात. अशीच कथा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर जिल्ह्यात सध्या कथन केली जात आहे. मात्र, या कथेत थोडा फरक आहे तो म्हणजे, आंधळे हत्तीचे वर्णन न करता हत्तीच प्रत्येक ठिकाणी आभार सभेमध्ये सांगत आहे की, केवळ तुमच्यामुळेच आमचा विजय झाला, आता विधानसभेला तुम्हालाच केवळ साथ देणार. आता निवडणूक कशी जिंकली ही गोष्ट सामान्य मतदारालाच नव्हे तर आंधळ्या माणसालाही ज्ञात आहे. निवडणुकीत यश मिळाले ते कुणाच्या प्रतिष्ठेमुळे. सध्या तरी सात आंधळे आणि एक हत्ती याची कथा विधानसभेचे जागा वाटप होईपर्यंत रंगणार आहे.

हेही वाचा >>>RSS व भाजपात समन्वयाच्या अडचणी, संघानं केलं मान्य; प्रसिद्धीप्रमुख म्हणाले, “हे फक्त व्यवस्थापनात्मक…”

अल्पकाळ खासदारकी भूषविलेले दोन वसंत चव्हाण

नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अवघ्या साडे तीन महिन्यांतच काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले. अल्पकाळ खासदारकी भूषविण्यास मिळालेले ते दुसरे वसंत चव्हाण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २००५ मध्ये पोटनिवडणुकीत राज्यसभेवर वसंत छोटेलाल चव्हाण हे निवडून आले होते. राज्यसभेवर निवड झाल्यावर वर्षभराच्या आधीच वसंत चव्हाण यांचे निधन झाले होते. नांदेडमधून लोकसभेवर निवडून आलेले वसंत चव्हाण आणि राज्यसभेवर निवडून आलेले वसंत चव्हाण या दोन्ही चव्हाणांची खासदारकीची कारकीर्द अल्पकाळाची ठरली. दोन्ही वसंत चव्हाणांचा हा दुर्दैवी योगायोग.

(संकलन : संतोष प्रधान, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे )