नाशिक : शिवसेनेच्या फुटीच्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडणाऱ्या आमदारांपैकी एक असलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचे आव्हान असणार आहेच; परंतु महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ हेही कांदेंना रोखण्यासाठी व्यूहरचना आखत असल्याचे समजते.
शिवसेना दुभंगल्यावर कांदे हे सर्वात आधी शिंदेंबरोबर बाहेर पडले होते. आगामी निवडणुकीत विद्यामान आमदार असल्याने नांदगावची जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे असणार हे निश्चित. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकीत छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी नांदगावमधून विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेच्या सुहास कांदेंनी ११ हजार मतांनी त्यांना पराभूत केले. या तिन्ही निवडणुकीत पंकज भुजबळ यांना ६० ते ७५ हजारादरम्यान मते मिळाली होती. हक्काची मते असणारा हा मतदारसंघ मित्र पक्षाला आणि तेही कट्टर विरोधकाला सोडणे भुजबळ गटाला पचनी पडणारे नाही. कांदेंचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पुतण्या समीर भुजबळांना पुढे करण्यात आले आहे. त्यांच्या मतदार संघात भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रसंगी अपक्ष म्हणून त्यांना मैदानात उतरविण्याची रणनीती असल्याचे सांगितले जाते.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. जिल्हा नियोजन समिती असो वा स्थानिक राजकारणात कांदे यांनी भुजबळांना कधीही जुमानले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच नांदगावमध्ये शिवसृष्टीचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्र्यांसमोर कांदेंनी नामोल्लेख टाळून भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते. आता काही जण मतदारसंघात फिरून उमेदवारी करणार असल्याचे सांगतात. आपल्या कार्यकाळातील कामे आणि पूर्वीच्या आमदारांनी १० वर्षात केलेली कामे यांची तुलना करण्याचे आव्हान त्यांनी दिले.
ठाकरे गटाने गणेश धात्रक यांच्याकडे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सोपवत कांदेंना पराभूत करण्यासाठी आधीपासून तयारी चालविली आहे. ठाकरे गटाचे धात्रक हेच महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जातात. गणेश धात्रकांचे वडील जगन्नाथ धात्रक यांनी दोनवेळा काँग्रेसकडून नांदगावचे प्रतिनिधित्व केले होते. शिवसेना दुभंगल्यानंतर उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचा लाभ या मतदारसंघात होईल, असा ठाकरे गटाचा कयास आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत नांदगाव या एकमेव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना ४१ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या जागेवर आपला प्रभाव टिकून असल्याचे शिवसेना शिंदे गटाला वाटते.
विरोधकांची संख्या अधिक
प्रतिकूल परिस्थितीतही लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना नांदगाव विधानसभा मतदार संघातून आघाडी मिळवून देण्यात यश आल्याने शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे निश्चितच महायुतीत वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत भुजबळ यांच्याकडून या मतदारसंघात होत असलेल्या हालचालींना वेगळाच अर्थ प्राप्त होत आहे. कांदे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे सर्वच विरोधक एक होण्याची चिन्हे आहेत.
© The Indian Express (P) Ltd