लातूर: उदगीरच्या आरक्षित मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्षे राज्यमंत्री आणि नंतरची अडीच वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून भूषवणारे संजय बनसोडे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक तितकी सहज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बनसोडे यांची महायुतीतून उमेदवारी निश्चित असल्याचे दिसताच भाजपचे सुधाकर भालेराव आणि परभणीचे अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावून घेत आपली शक्ती दाखवून दिली. पहिल्यांदा निवडून येऊन अडीच वर्षांत राज्यमंत्री व त्यानंतर उर्वरित अडीच वर्षांत ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र, विरोधकांनी २०२४ च्या निवडणुकीत त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर सलग दोन वेळा भाजपचे सुधाकर भालेराव या मतदारसंघातून निवडून आले. २०१९ मध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांच्या जागी परभणीच्या अनिल कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांना पराभूत करणारे संजय बनसोडे यांनी संघ परिवारातही आपला संपर्क वाढवला आहे. मात्र, आता त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एकवटल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>Punjab Govt vs Central Govt: “मला गडकरींना हे सांगायचंय की तुम्ही…”, ‘आप’ची ‘त्या’ पत्रावरून आगपाखड; पक्षप्रवक्ते म्हणाले…

महायुतीत ही जागा अजितदादा गटाकडे सुटणार आहे त्यामुळे भाजपत अंतर्गत नाराजी आहे. शिवसेना शिंदे गटाची उदगीर मतदारसंघात फारशी ताकद नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसची ताकद उदगीरमध्ये अधिक आहे. आमदार अमित देशमुख यांनीही संजय बनसोडेंची कोंडी करण्याची व्यूहरचना आखत असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसमधील माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, मधुकर एकुर्गीकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. मात्र, येथे लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला. माजी आमदार धर्मा सोनकवडे हेही भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले. त्यामुळे शरद पवार गटांकडे आता इच्छुकांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा >>>Kirit Somaiya: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा किरीट सोमय्यांना धक्का; चौकशी आवश्यक असल्याचे दिले आदेश

बुद्ध विहारच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा दौरा

महाराष्ट्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सप्टेंबर महिन्यात उदगीरला येत असून चार सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील २० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आपल्या मतदारसंघात आपण केलेल्या विकासकामाचा आपल्याला लाभ होईल. आपला थेट संपर्क राष्ट्रपतींपर्यंत आहे हे मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय बनसोडे करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta karan rajkaran contest between sanjay bansode sudhakar bhalerao and anil kamble for assembly election 2024 from udgir constituency latur print politics news amy
Show comments