Dada Bhuse vs Bandu Bachchao in Malegaon Assembly Constituency मालेगाव : २००४ च्या विधानसभा निवडणुकीत हिरे घराण्याच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर पुढच्या प्रत्येक निवडणुकीत विजयाचा आलेख उंचावणारे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना आगामी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. भुसे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक बंडू बच्छाव यांनी शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारीवर दावा केला असल्याने मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांच्यासमोर मोठा अडथळा उभा ठाकला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भुसे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे रिंगणात होते. या निवडणुकीत शेवाळे यांचा ४८ हजार मतांनी पराभव झाला. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात गेलेले भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकामसारखे वजनदार खाते आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरादेखील त्यांच्यावर आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली, तेव्हा मालेगाव बाह्यची जागा भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला येईल आणि आपली राजकीय पंचाईत होईल, अशी शक्यता गृहीत धरत भुसे यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुढे, महायुती सत्तेत आल्याने बदललेल्या परिस्थितीत हिरे यांची पुन्हा राजकीय गैरसोय झाली. त्यामुळे भविष्यातील उमेदवारीचे गणित लक्षात घेत हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटालाही एका प्रबळ उमेदवाराची गरज होतीच. हिरे यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे वर्षभरापूर्वी झालेल्या विशाल मेळाव्यात ठाकरे गटाकडून हिरे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. हेही वाचा >>>जत कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान दरम्यानच्या काळात नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी हिरे यांना अटक झाली. नऊ महिन्यांपासून कारागृहात राहिल्यावर १२ ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मंजूर झाला. अटकेची नामुष्की हिरे तसेच ठाकरे गटाच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे दादा भुसेंना दिलासा मिळाला असला तरी, त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय बंडू बच्छाव आता निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छित आहेत. बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असलेल्या बच्छाव यांनी ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नुकतीच भेट घेऊन सक्रिय राजकारणाचे संकेत दिले आहेत. तसेच हिरे किंवा आपल्याला उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण शक्तिनीशी लढण्याचेही सूतोवाच केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होऊन विखुरलेल्या विरोधकांमुळे लाभ होईल, अशी भुसे गोटाची अटकळ होती. परंतु, ठाकरे गटात सक्रिय होण्याचा बच्छाव यांनी घेतलेला निर्णय आणि हिरे यांना मिळालेला जामीन या लागोपाठ घडलेल्या घडामोडी भुसे यांची डोकेदुखी वाढविणाऱ्या आहेत. हेही वाचा >>>अलिबागमध्ये महायुतीत वादाची ठिणगी लोकसभा निवडणुकीत मताधिक्य कायम भुसे हे २० वर्षांपासून आमदार असल्याने त्यांना प्रस्थापितविरोधी वातावरणाचा फटका बसेल, अशी चर्चा होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातील मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघात भाजपने ५५ हजाराचे मताधिक्य घेतले. भुसे यांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.