२०२४ साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. या वर्षाच्या शेवटी तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांसह मध्य प्रदेशमध्येही विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथील नेतेमंडळी आपल्याला सोईच्या असणाऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले तथा भाजपाचे माजी खासदार बोधसिंह भगत यांनी नुकतेच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भगत यांच्या सोडचिठ्ठीमुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला चांगला फटका बसू शकतो.

भगत २००३ ते २००८ या काळात आमदार

२०१४ साली भगत भाजपाच्या तिकिटावर बालाघाट मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०१९ साली भाजपाचे नेते गौरीशंकर बिसेन यांच्याशी मतभेद वाढल्यामुळे त्यांनी भाजपा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बिसेन यांनी स्वत:च्या गटातल्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रयत्न केल्यामुळे भगत यांनी हा निर्णय घेतला होता. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भगत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पुढे ते पुन्हा एकदा भाजपात परतले होते. ते १९८० ते २००२ या काळात पंचायत तसेच जनपदचे सदस्य होते. २००३ ते २००८ या काळात ते आमदार होते. भगत यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने भाजपाला मोठा फटका बसू शकतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

मी भ्रष्टाचार, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात निदर्शने केली- भगत

भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करताना त्यांनी भाजपा तसेच बिसेन यांच्यावर सडकून टीका केली. “बिसेन आणि माझ्यात वैचारिक मतभेद होते. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा बिसेन हे कृषी मंत्री होते. माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. मी अनेकवेळा आंदोलन केले, माझ्या मतदारसंघातील शेतकरी अडचणीत होते. मी भ्रष्टाचार, खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात निदर्शने केली. बिसेन यांना ते रुचले नाही”, असे बोधसिंह भगत म्हणाले.

१५०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

भगत यांनी बुधवारी (२० सप्टेंबर) मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बुधी येथील भाजपाचे नेते राजेश पटेल यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बुधी हा भाजपाचे नेते तथा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघातील प्रदेश आहे. राजेश पटेल यांच्यासोबत या मतदारसंघातील साधारण १५०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकतांत्रिक जनता दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह यांनीदेखील भगत यांच्यासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

बोधसिंह भगत, दिलीप सिंह, राजेश पटेल या नेत्यांव्यतिरिक्त १८ जनपद पंचायत सदस्य, २४ सरपंच, ४१ माजी सरपंच, दोन जनपद पंचायत अध्यक्ष, एक जिल्हा पंचायत सदस्य, चार माजी मंडळ अध्यक्ष आणि साधारण ८५० भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा काँग्रेसने केला.

शिवराजसिंह फक्त गो मातेचेच राजकारण करतात- राजेश पटेल

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजेश पटेल यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर सडकून टीका केली. “शिवराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघात खूप सारे प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच साधारण १५०० पेक्षा अधिक लोकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. माझे कुटुंबीय कायम भाजपासोबत राहिलेले आहेत. २०१८ सालापर्यंत आम्ही भाजपा पक्षाला मतदान केले. मात्र, २०१८ साली कमलनाथ यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. शिवराजसिंह फक्त गो मातेचे राजकाण करतात”, असे राजेश पटेल म्हणाले.

माझा लढा भाजपाविरोधात नव्हता- भगत

मध्य प्रदेशच्या काँग्रेस मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भगत यांनी बिसेन यांच्यावर टीका केली. “माझा लढा हा भाजपाविरोधात नव्हता. बनावट खते, बियाणे, किटकनाशके याच्याविरोधात माझा लढा होता. मी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला शांत करण्यात आले. त्यांनी एका भ्रष्ट व्यक्तीला मंत्री केले आहे. काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा हे सर्व जण तुरुंगात असतील”, असे भगत म्हणाले. भाजपात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

स्थानिकांना विश्वासात घेऊनच भगत यांना प्रवेश – काँग्रेस

काँग्रेस पक्षात भगत यांनी प्रवेश केल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भगत यांना तिकीट दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू अशा इशारा ब्लॉक पातळीवरच्या नेत्यांनी दिला आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली. भगत यांना काँग्रेस पक्षात घेण्यापूर्वी आम्ही स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले आहे. भगत हे ताकद असलेले मोठे नेते आहेत, असे मिश्रा म्हणाले.

पात्र लोकांनाच तिकीट मिळणार- भाजपा

तर भगत यांच्या काँग्रेस प्रवेशावर भाजपानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय नेते पक्षबदल करणे स्वाभाविक आहे. भाजपा पक्षात त्यांच्या महत्त्वाकांक्षांना स्थान दिले जात नाही, असे त्यांना वाटत असावे. आम्ही विकासासाठी काम करतो. विकास हेच आमचे धोरण आहे. सध्या मध्य प्रदेशच्या विकासाकडे बघा. आम्ही पात्र उमेदवारांनाच तिकीट देणार आहोत”, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चतुर्वेदी म्हणाले.

Story img Loader