Justice Swaminathan Impeachment Motion India Alliance : मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांना पदावरून हटविण्यासाठी तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाने महाभियोग आणण्याची तयारी केली आहे. त्या संदर्भातील प्रस्तावाला इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. लवकरच हा प्रस्ताव लोकसभेत सादर केला जाणार असून, त्यावर विरोधी पक्षातील अनेक खासदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके आहे तरी काय? कोण आहेत न्यायमूर्ती स्वामीनाथन? द्रमुकने त्यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी का केली? त्याविषयीचा हा आढावा…

नेमके काय आहे प्रकरण?

न्यायमूर्ती स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. मदुराई येथील एका वादग्रस्त ठिकाणी दिवा लावण्याबाबत त्यांनी दिलेल्या आदेशामुळे द्रमुक सरकार कायदेशीर वादात अडकले आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी १ डिसेंबर रोजी दिलेला आदेश न्यायालयाचा शिस्तभंग करणारा असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. २०१७ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचे निर्देश दिले होते. तरीदेखील एकल न्यायाधीश खंडपीठाने विभागीय खंडपीठाच्या निर्देशाला प्रभावीपणे रद्द करणारा आदेश दिल्याचे द्रमुकचे म्हणणे आहे.

न्यायमूर्ती स्वामीनाथन यांचा निर्णय काय?

द्रमुकने महाभियोगाची तयारी केली असली तरी हा मुद्दा न्यायाधीशांच्या पदावरून हटविण्यासाठी पुरेसा ठरू शकतो का, याबाबत इंडिया आघाडीतील काही खासदारांच्या मनात साशंकता आहे. एखादा निकाल आवडला नाही म्हणून न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची मागणी करता येत नाही. त्यासाठी त्यांचे गैरवर्तन सिद्ध करावे लागते, असे इंडिया आघाडीतील एका खासदाराने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी १ डिसेंबर रोजी मदुराई येथील एका वादग्रस्त ठिकाणी ‘तिरुपरनकुंद्रम दीपम’ प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. याच ठिकाणाला लागून ऐतिहासिक दर्गाही आहे.

आणखी वाचा : ‘वंदे मातरम’वरून वाद कशासाठी? प्रियांका गांधींचे मोदींना प्रत्युत्तर; लोकसभेत सांगितली ३ कारणे

द्रमुक सरकारने केला होता विरोध

द्रमुक सरकारने या आदेशाला विरोध केल्यामुळे अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा निर्देश पाळला नव्हता. त्यामुळे काही दिवसांनंतर न्यायमूर्तींनी तीव्र अवमान याचिका जारी केली होती. यावेळी त्यांनी याचिकाकर्त्यासह इतर १० जणांना टेकडीवर चढून दीप प्रज्वलन करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्यांना केंद्रीय औद्योगिक दलाची सुरक्षादेखील पुरवली होती. भाजपाने या निर्णयाला उघडपणे पाठिंबा दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सरकारची कोंडी झाली आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या आदेशाविरोधात मदुराईचे जिल्हाधिकारी व तिरुपरंकुंड्रम येथील सुब्रह्मण्यम स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १२ डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्तींना पदावरून कसे हटवता येते?

सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींना पदावरून हटविण्यासाठी संसदेत महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात अनुच्छेद १२४ (४) तर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात २१७ (१) (ब) मध्ये महाभियोगाची तरतूद करण्यात आली आहे. न्यायमूर्तींकडून गैरवर्तन, भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो. संसदेच्या उभय सभागृहांतील सदस्यांनी दोन-तृतीयांश मतांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास महाभियोग मंजूर होतो. लोकसभेत किमान १०० सदस्यांनी, तर राज्यसभेत ५० सदस्यांनी स्वाक्षरी केल्यास न्यायाधीशांविरुद्धची तक्रार विचारात घेतली जाते. हा प्रस्ताव सादर झाल्यावर सभागृहाचे पीठासीन अधिकारी तो स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेतात. सध्या द्रमुकचे लोकसभेत २२ सदस्य असून, त्यांना ७८ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती स्वामीनाथन?

न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या भूमिकांवर द्रमुक पक्षाने अनेकदा आक्षेप घेतलेला आहे. तमिळनाडूमधील वाढत्या सांस्कृतिक संघर्षाला त्यांनी न्यायालयाच्या अग्रभागी नेल्याचा आरोप वारंवार होत आहे. न्यायमूर्ती स्वामीनाथन आपल्या निकालांमधून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी पुढे नेत असल्याचा आरोप द्रमुकचे नेत्यांनी केला आहे. त्यांच्या निकालांमध्ये अनेकदा प्राचीन ग्रंथांचे संदर्भ आढळून येतात, असे द्रमुकच्या नेत्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या प्रकरणात न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी अधिकाऱ्यांनी दिवा लावण्याची सोय न केल्यास, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : फडणवीसांच्या भूमिकेला शिंदेसेनेचा विरोध? महायुतीत पुन्हा वादाची ठिगणी; कारण काय?

न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्यावर अनेक आक्षेप

या प्रकरणादरम्यान न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी केलेल्या एका भाषणातील मुद्दा चर्चेत आला आहे. त्यात त्यांनी रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर एका व्यक्तीला कायदेशीर अडचणीतून बाहेर काढल्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी वकील असलेले स्वामीनाथन भाषणात म्हणाले होते की- पोलिसांकडे विश्वसनीय साक्षीदार नसल्याने ते वेदांचे जाणकार असलेल्या व्यक्तीला अपघाताच्या खटल्यातून बाहेर काढू शकले. आपण वेदांचे रक्षण केले, तर वेदही आपले रक्षण करतात, असे स्वामीनाथन त्यावेळी म्हणाले होते. यापूर्वीही काही प्रकरणांत न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी राज्य सरकारला सार्वजनिक सुव्यवस्था किंवा प्रशासकीय सोईच्या नावाखाली हिंदू धार्मिक प्रथा कमकुवत करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते.

महाभियोग मांडण्याची प्रकिया कशी असते?

सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करून घेण्यात आल्यावर राज्यसभा अथ‌वा लोकसभेकडून त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली जाते. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व एका प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञाचा समावेश असतो. या समितीकडून आरोपांची सविस्तर चौकशी केली जाते. ज्या न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग चालविला जाणार आहे, त्यांना त्यांची सविस्तर बाजू मांडण्याची संधी दिली जाते. चौकशी समितीला आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यास प्रस्ताव मताला टाकण्याची प्रक्रिया केली जाते. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश किंवा एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो. लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये हा प्रस्ताव दोन-तृतीयांश उपस्थित सदस्यांच्या पाठिंब्याने किंवा साध्या बहुमताने मंजूर झाल्यावर तो राष्ट्रपतींकडे पाठविला जातो. त्यानंतर राष्ट्रपती संबंधित न्यायमूर्तींना पदावरून हटवितात.