राहाता : गेल्या सहा विधानसभा निवडणुकांपासून शिर्डी मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात मविआला अद्याप उमेदवार मिळालेला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत शिर्डी आणि नगरमधून विखेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव झाल्यापासून मविआच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यासाठी भाजपमधील नाराजांचीही मदत घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डी विधानसभा मतदारसंघ राहाता व संगमनेर तालुक्यातील गावांचा मिळून तयार झालेला आहे. शिर्डी मतदारसंघ हा मंत्री विखे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या आधारावरच त्यांनी नगर जिल्ह्याचे नेतृत्व ठेवण्याचा प्रयत्न केला. घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर नेतृत्व करतात. मात्र स्थानिक पातळीवर मंत्री विखे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे ‘मविआ’चे नेते व भाजपमधील काही नाराजांच्या मदतीने करीत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात व कोपरगावमधील भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी एकत्र येत गणेश कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यातून घेण्यात यश मिळवले. असाच प्रयोग विधानसभा मतदारसंघात विखेंच्या विरोधात होणार का? याचे औत्सुक्य आहे.

हेही वाचा >>> Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची तयारी, सभापतींना हटवण्याची प्रक्रिया काय?

राज्यात मंत्रिपदी असताना विखेंनी आपला मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे व पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी पराभव केला. त्यामुळे डॉ. विखे यांनी पुन्हा आपले लक्ष शिर्डी मतदारसंघावर केंद्रित केले आहे.

शिर्डी गड काबीज करण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार थोरात यांनी मंत्री विखे विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यंदा त्याला यश लाभेल का, याचीच उत्सुकता आहे. माजी मंत्री आमदार थोरात हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व भाजपमधील काही नाराज नेत्यांना बरोबर घेऊन मंत्री विखेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. यापूर्वीच्याही निवडणुकीत सर्वच पक्ष एकत्र आले होते. मात्र विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही. शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचा विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा असेल याची अद्यापि वाच्यता ‘मविआ’कडून झालेली नाही.

मतदारसंघाच्या निर्मितीनंतर शिर्डीची राजकीय स्थिती

२०१९ – राधाकृष्ण विखे (भाजप) १,३२,३१६ ( विजयी), सुरेश थोरात (काँग्रेस) ४५,२९२, विशाल कोळगे (बहुजन वंचित आघाडी) ५७८८.

२०१४ – राधाकृष्ण विखे (काँग्रेस) १,२१,४५९ (विजयी), अभय शेळके (शिवसेना) ४६,४९७, राजेंद्र गोंदकर (भाजप) १७,२८३

२००९ – राधाकृष्ण विखे (काँग्रेस) ८०,३०१ (विजयी), राजेंद्र पिपाडा (शिवसेना) ६६,९९२

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi not found candidate against radhakrishna vikhe patil in shirdi assembly elections print politics news zws
Show comments