आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : निवडणूक आयोगाने आज जाहीर पत्रकार परिषद घेत मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली… मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला… पक्षविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी भाजपाने अकोला जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली… राज ठाकरेंना बरोबर घेणे ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले… महायुतीच महापालिका निवडणुकीत ‘धुरंधर’ ठरणार असल्याचा दावा करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार पुढील वर्षी १५ जानेवारीला सर्व महापालिकांसांठी मतदान घेतले जाणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्या संदर्भातील माहिती दिली आहे. उमेदवारांना नामांकन अर्ज भरण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी सर्व अर्जाची निवडणूक आयोगाकडून छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ असणार आहे. निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी ३ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी वापरण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यात एकूण ३. ४८ कोटी मतदार असून, ३९ हजार १४७ मतदार केंद्र आहे.
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमीत साटम व विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. तत्पूर्वी तेजस्वी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली होती. “शिवसेना (उबाठा) सोडून भाजपात येण्याचा हा निर्णय खूपच कठीण होता. हा निर्णय घेण्यामागे अनेक गोष्टी आहेत. परंतु त्यावर मी आत्ताच बोलू शकत नाही. ज्या पक्षाने मला ओळख दिली तो पक्ष सोडताना मला खूप दुःख होत आहे. मात्र, माझ्या प्रभागामधील विकासकामांसाठी मी हा निर्णय घेतला आहे,” असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर…” राहुल गांधींचा थेट इशारा; मोदी-शाहांबाबत काय म्हणाले?
भाजपातून चार जणांची तडकाफडकी हकालपट्टी
पक्षविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने अकोला जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यात याआधीदेखील काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, हिवरखेड नगरपालिका व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे बाळापूर येथील निवडणूक लांबणीवर गेली. आता २० डिसेंबरला त्या ठिकाणी मतदान होणार आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी अनेक जण इच्छूक असल्याने मूर्तिजापूर येथे भाजपांतर्गत नाराजी होती. त्यातून अनेकांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला आहे. पक्षविरोधी कृत्याचा पुरावा तसेच उमेदवार हर्षद साबळे यांच्या तक्रारीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी चार पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची कारवाई केली आहे.
राज यांना बरोबर घेणे ही उद्धव ठाकरेंची चूक : आठवले
राज ठाकरेंना बरोबर घेणे ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचे सनसनाटी विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी काही भूमिका होती ती भूमिका उद्धव ठाकरे हे विसरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना बरोबर घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी करायला नको होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबईतील अमराठी मते मोठ्या प्रमाणात महायुतीला मिळतील. मुंबई शहरात ४० टक्के मराठी मते आणि ६० टक्के अमराठी मते आहेत. तसेच मराठी मतांमध्ये महायुतीला देखील मोठ्या प्रमाणात मराठी मते मिळतील, असा दावा आठवले यांनी केला आहे.
हेही वाचा : प्रशांत किशोर यांची काँग्रेसशी पुन्हा जवळीक? प्रियांका गांधींबरोबरच्या भेटीची का होतेय चर्चा?
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
महापालिका निवडणुकीत धुरंधर ठरणार असल्याचा दावा करीत मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रहमान डकैत’ कोण आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई फास्ट आणि महाराष्ट्र सुपरफास्ट असा नाराही त्यांनी यावेळी दिला. मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या ‘रहमान डकैत’चा शोध घेतला पाहिजे. इतिहासात अनेक रहमान डकैत आले. मात्र, अशा लोकांना पाणी पाजणारी महायुती ‘धुरंधर’ आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. काही लोक वारंवार मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आमचा डाव असल्याचे आरोप करतात. मात्र कुणीही ‘माई का लाल’ मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचे हृदय आहे. मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले असल्याचे शिंदे म्हणाले.
