छत्रपती संभाजीनगर : परळीमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे व्यापारी हैराण आहेत. त्यांच्या गुंडगिरीच्या विरोधात उभे टाका , असे सांगत शरद पवार यांनी परळीमध्ये मतांची जुळवाजुळव करण्यावर भर दिला. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाकडून कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर आणि लोह्यामधील एका शिवसैनिकाच्या हाताची बोट छाटल्याच्या घटनेमुळे गृहमंत्रालय टीकेच्या केंद्रस्थानी यावे असे प्रयत्न दिसू लागले आहेत.
४० वर्षापूर्वीच्या एका खुनाचा संदर्भ देत शरद पवार यांनी परळीतील व्यापारी कसे हैराण आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याचे सांगत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या राजेसाहेब देशमुख यांना बळ दिले. तर कळमनुरीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मतदारांची पूर्वी संतोष बांगर यांची केलेली निवड ही मोठी चूक होती म्हणून मतदारांची माफी मागितली. ‘गद्दार’ वगैरे शब्द वापरताना बांगर यांच्या गुंडगिरी संपविण्यासाठी सर्वसामांन्य उमेदवारास पुढे आणले असल्याचे सांगितले. संतोष बांगर यांच्या कारभाराविषयी नंतर माहिती मिळाल्याचा युक्तीवादही त्यांनी केला.
आणखी वाचा-महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
मात्र, संतोष बांगर व धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील गुंडगिरी चर्चेत यावी असे प्रयत्न नेत्यांकडून केले जात आहेत. लोहा मतदारसंघात समाजमाध्यमांवर विरोधात मजकूर लिहिल्याने बोट कापल्याचे प्रकरण या मतदारसंघात चर्चेत असणाऱ्या मुद्द्याला उद्धव ठाकरे यांनी उचलून धरल्याने आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मराठवाड्यातील तीन मतदारसंघात गुंडगिरीचा मुद्दा पुढे करुन गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून केला जात आहे.