बदलापूर : लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे कपिल पाटील यांच्या पराभवानंतर या पट्ट्यातील राजकीय गणिते बिघडली आहेत. पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न न केल्याबद्दल मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरेंची पक्षातूनच कोंडी केली जात असताना बदलापूरमधील शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे मुरबाडच्या उमेदवारीवर दावा केल्याने कथोरे कात्रीत सापडले आहेत. हेही वाचा >>> शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत ; मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी ५५०० कोटी लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे निवडून आले. या विजयामध्ये मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा मोठा प्रभाव असल्याची प्रतिक्रिया खुद्द कपिल पाटील यांनीच दिली होती. त्यामुळे कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे यांचा अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आला होता. कथोरे यांच्या समर्थकांनीही सुरेश म्हात्रे यांच्या विजयाचे संदेश समाजमाध्यमांवरून प्रसारित करताना त्याचे श्रेय कथोरे यांना दिले होते. त्यामुळे हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आता भाजपमध्ये पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला असून कपिल पाटील यांच्या समर्थकांनीही कथोरेंच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हेही वाचा >>> नियमभंग करणाऱ्या पब, बारवर कारवाई करा ! मुख्यमंत्र्यांचे आदेश नुकत्याच पार पडलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे निरंजन डावखरे यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला. मात्र या निमित्ताने मुरबाड मतदारसंघात शिवसेना आणि भाजपात कुरबुरी पहायला मिळाल्या. त्यातच शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे असे वक्त्यव्य करून मुरबाड मतदारसंघावर दावा सांगितला. यामुळे कथोरे यांची दुहेरी कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या प्रभावामुळे मागील निवडणुकीत कथोरेंचा विजय सोपा झाल्याचा दावाही म्हात्रे यांनी केला. वामन म्हात्रे यांनी उमेदवारीसाठी दावा केल्यास कथोरेंना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनही विरोध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कथोरे समर्थकांना आपल्या नेत्याच्या उमेदवारीबाबत खात्री आहे. वामन म्हात्रे यांनी याआधीही कथोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यामुळे कथोरेंचा विजय सोपा झाल्याचे कथोरेंचे समर्थक सांगत आहेत.