लातूर : ‘माझी बॅग तपासली, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा. ‘ मोदी- शहां’ची पण बॅग तपासली गेली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. लोकशाहीमध्ये समान न्याय हवा, पण दुर्दैवाने एकाच पक्षाच्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला आत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. औसा तालुक्यातील कासारशिरशी येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण मोदी व अमित शहा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत. त्यामुळे महायुतीच्या विरोधात मत करण्याचे आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले. महाविकास आघाडी सत्तेत असताना आम्ही कर्जमाफी करून दाखवली. वास्तविक मला दुसऱ्यांदा कर्जमाफी करायची होती. मात्र, तोपर्यंत आमचं सरकार पाडलं. कारण सरकार पाडून महाराष्ट्र लुटून तो गुजरातला न्यायचा होता, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस

महायुतीला निवडून देणे म्हणजे दरोडेखोरांना निवडून देणे, स्वाभिमान गहाण ठेवणे, अदानीच्या लाचार मंडळींना निवडून देणे हे तुम्ही करणार की शिवरायांचे मावळे, स्वाभिमानी सैनिक यांना निवडून देणार, याचा विचार करा महाराष्ट्र पुन्हा घडवायचा असेल तर महाविकास आघाडीलाच निवडून द्या, असे अवाहन ठाकरे यांनी केले. व्यासपीठावर आमदार अमित देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, संजय शेटे यांची उपस्थिती होती.

बॅगेची पुन्हा तपासणी

कासारशिरशी येथे होणाऱ्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर औसा येथे उतरले असता निवडणूक आयोगाच्या पथकाने उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमध्ये पथकाने डोकावून पाहिले. तसेच बॅगही तपासली. अशा प्रकारे बॅगा तपासण्या अन्य कोणत्या नेत्याच्या झाल्या, तुम्हाला अशा बॅगा तपासणी करण्याचे अधिकार आहेत का, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ठाकरे यांच्या बॅग तपासणीमुळे तो मुद्दा सभेत पुन्हा चर्चेत आला.

Story img Loader