सांगली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या नेतृत्वाची सुरू झालेली स्पर्धा आता विधानसभा निवडणुकीवेळी निर्णायक वळणावर पोहचण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यातच जिल्हा नेतृत्वाची स्पर्धा होण्याची चिन्हे गेल्या दोन दिवसातील दोघांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहेत. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा आहेत. राष्ट्रवादीने चार आमदारांचे तर काँग्रेसने पाच आमदारांचे लक्ष्य ठेवले असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामुळे महाविकास आघाडीत जागा आठ आणि हक्क नऊ जागांचा असे गणित बसविण्याचे प्रयत्न असताना उबाठा शिवसेनेच्या वाट्याला फारसे काही देण्याची मानसिकता उभयतांमध्ये दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी आणि पलूस-कडेगाव हे सहा मतदार संघ सांगली लोकसभा मतदार संघामध्ये तर वाळवा आणि शिराळा हे दोन मतदार संघ हातकणंगले लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदार संघाचे प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने सांगलीचे खासदार हेच जिल्ह्याचे खासदार अशी ओळख आहे.

हेही वाचा…सर्वच पक्षांना मतांच्या फाटाफुटीचा धोका, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी चुरस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते म्हणून करण्यात आला. राज्यात १० जागा लढून ८ ठिकाणी विजय संपादन केल्याने राज्य पातळीवर आश्‍वासक नेतृत्व म्हणून त्यांचा इस्लामपूरात भव्य सत्कार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील आणि विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड हे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी जिल्ह्यात तीन आमदार निवडून येण्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगत आणखी एक दोन आमदार जिल्ह्यातून यायला हवेत, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असा संदेश दिला. त्यांच्या नजरेसमोर सांगली, मिरज हे दोन मतदार संघ असावेत असे प्रथम दर्शनी दिसते. कारण जत व पलूस-कडेगाव हे दोन मतदार संघ सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. यामुळे आमदार पाटील यांचा सांगली व मिरजेवर डोळा असणार अशी शक्यता दिसत आहे. या ठिकाणीचे प्रतिनिधीत्व सध्या भाजपकडे आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मिरजेचे तर आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे सांगलीचे प्रतिनिधीत्व आहे. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदार संघाने भाजपविरोधी मताधिक्य नोंदवले आहे.

हेही वाचा…पवार विरुद्ध पवार! आपल्याच काकांना शह देणाऱ्या कोणत्या पुतण्याचे राजकारण ठरणार यशस्वी?

दुसर्‍या बाजूला शुक्रवारी मदन पाटील युवा मंचने नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने स्नेहमेळावा आयोजित करून स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसचे नेतृत्व म्हणून पाहिले जाणार्‍या माजी राज्यमंत्री डॉ.विश्‍वजित कदम यांनी जिल्ह्यातून चार ते पाच जागेवर काँग्रेस लढणार असल्याचे सांगत अप्रत्यक्ष अतिरिक्त दोन ते तीन मतदार संघावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसची झालेली एकजूट कुणाला तरी पाहवली नाही, म्हणून खडे टाकण्याचे काम केले. अशांना मतदारांनीच जागा दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेला त्रास असह्य होता, जाहीर पणे हा त्रास कथन करणार असल्याचे सांगितले. त्यांनी अद्याप हा त्रास देणारे कोण आहेत हे जाहीर पणे सांगितले नसले तरी झारीतील शुक्राचार्य कोण याची चर्चा होत राहील अशीच अपेक्षा यामागे आहे. अप्रत्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे अंगुलीनिर्देश असला तरी त्यांनी जाहीर वाच्यता टाळली आहे. यामुळे यापुढील काळात महाविकास आघाडीतील जागांचा संघर्ष अधिक तीव्र होणार हेही स्पष्ट असून राजकीय पटावर आता कोणते डाव टाकले जातात आणि कोणाचा कोण कार्यक्रम करणार याची उत्सुकता राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2024 jayant patil and vishwajeet kadam compete for supremacy over sangli print politics news psg