मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना काँग्रेसने ४८ जणांच्या पहिल्या यादीत स्थान देण्यात आले. अन्य पक्षांप्रमाणेच काँग्रेसच्या यादीतही घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आले. धारावीतून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी देण्यात आल्याने जुनेजाणते कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २७ विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीत १०० जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. अजूनही काही जागांवरून काँग्रेसची शिवसेनेशी (ठाकरे) ताणाताणी सुरूच आहे. काँग्रेसच्या यादीत बहुतांशी विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यात पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, विश्वजीत कदम, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांचा समावेश आहे. माजी आमदार नसिम खान (चांदिवली), मुझ्झफर हुसेन (मीरा-भाईंदर) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> जागावाटपावरून पुन्हा ताणाताणी; संजय राऊत वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक वाद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल गुडधे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यांच्या विरोधात तिरुपती कोंडेकर या मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्याला रिंगणात उतरविण्यात आले आहे. भाजपमधून स्वगृही प्रवेश केलेल्या डॉ. सुनील देशमुख (अमरावती) तर गोपाळदास अगरवाल (गोंदिया) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
घराणेशाहीचे प्रतिबिंब
● रावेर मतदारसंघातून विद्यामान आमदार शिरीष चौधरी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
● मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची लोकसभेवर निवड झाल्याने धारावी मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. पण वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.
● नांदेड जिल्ह्यातील नायगावमधून माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मीनल यांना पक्षाने संधी दिली आहे. ● माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र अमित देशमुख व धीरज देशमुख यांना पु्न्हा उमेदवारी देण्यात आली.