मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले. आरक्षण संपवणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच आहे. राहुल गांधी यांनी ती व्यक्त केली, असे टीकास्त्र बावनकुळे यांनी सोडले.

लोकसभा निवडणुकीआधी जातनिहाय जनगणना, आदिवासी, दलित जनतेबद्दल कळवळा दाखविणाऱ्या काँग्रेसची सामाजिक न्यायासंदर्भातली भूमिका किती दुटप्पी आहे, हे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने कायम लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली असून आता काँग्रेसची मजल आरक्षण रद्द करण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत गेली आहे, असा घणाघात बावनकुळे यांनी केला. भाजप जनतेमध्ये जाऊन याबाबत प्रबोधन करेल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> हरियाणामध्ये ‘आप’ला बळ; केजरीवाल यांच्या सुटकेमुळे नेते, कार्यकर्त्यांची भावना

रणधीर सावरकर यांनी अकोला येथे काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. शेलार, पंकजा मुंडे व आमदार मिहीर कोटेचा यांनी घाटकोपर येथे आंदोलन केले. राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकावर जाऊन माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन राज्यभर सुरू राहील, असा इशारा शेलार यांनी दिला. या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही शेलार यांनी केला. काँग्रेसचा इतिहास बघता त्यांनी कायमच लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

आंदोलन कुठे?

आंदोलनात मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे यांनी जळगावात, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे, मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर, माजी खासदार व राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावीत, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी नंदूरबार, आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर, आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीत, तर आमदार देवयानी फरांदे नाशिकमध्ये आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.