महेश सरलष्कर

महाराष्ट्रच नव्हे तर, अन्य राज्यांतील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेही ‘आमचे असून आम्हीच खरी शिवसेना’ असल्याच्या दावा अधिक आक्रमक करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीत शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. वेगवेगळ्या १३ राज्यांतील शिवसेनेचे राज्यप्रमुख शिंदे गटात सामील झाले.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामीळनाडू, पुड्डुचेरी, मणिपूर, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, हरियाणा, केरळ अशा राज्यातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. शिंदे दिल्ली येण्याआधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या राज्यप्रमुखांची बैठकही घेतली. त्यानंतर महाराष्ट्र सदनामध्ये बुधवारी रात्री साडेआठनंतर राज्यप्रमुखांनी शिंदेचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र सदनात येण्यापूर्वीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती. ढोल-ताशे वाजवले जात होते. फटाक्यांची आतषबाजी झाली. शिंदेची शिवसेना फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर देशव्यापी असल्याचा संदेश दिला गेला.

हेही वाचा : भाजपचे ‘मिशन बारामती’ सुरू पण हेतू साध्य होणार का ?

शिंदे यांनी देखील राज्यप्रमुखांना शिवसेनेचा (शिंदे गटाचा) इतर राज्यांमध्ये विस्तार करण्याचे आवाहन केले. ‘’तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी देईन. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, त्यांचीही मदत आपल्याला मिळेल. मी तुमच्या मधील एक आहे, मी नेहमी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन’’, असे भावनिक आवाहन शिंदेंनी राज्यप्रमुखांना केले.

राज्यात शिंदे गटाची सत्ता असली तरी, खरी शिवसेना कोणाची याचा अजून निकाल लागलेला नाही. अन्य राज्यांतील शिवसेनेचे नेते शिंदे गटात सामील झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाला निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी आणखी पाठबळ मिळाले आहे. शिंदे गट व उद्धव गटाची आत्ता सगळा संघर्ष ‘’धनुष्य-बाण’’ हे निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी सुरू आहे. हे अजून मिळालेले नसले तरी, बुधवारी राज्यप्रमुखांच्या कार्यक्रमात लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना धनुष्य-बाणाची प्रतिकृती भेट दिली. शिंदेंनी दिल्लीवारी कशासाठी केली, याचे अप्रत्यक्ष उत्तर या प्रतिकृतीतून मिळत होते. मग, अगदी टिपिकल उत्तर भारतीय प्रतिके भेट दिली गेली. उत्तर भारतात शक्तिप्रदर्शनात तलवार नसेल तर कार्यक्रम कसा पूर्ण होणार? राजस्थानमधील शिवसैनिकांनी तलवार शिंदेंच्या हाती दिली. दिल्लीचे राज्य प्रमुख संदीप चौधरी यांनी हनुमानाची गदा दिली!

हेही वाचा : कायदेशीर लढाईतूनच बाहेरच्या राज्यातील पक्ष प्रमुखांना शिवसेनेच्या दोन्ही गटांचे व्यासपीठावर स्थान

राज्या-राज्यातून आलेल्या राज्यप्रमुखांची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकच तक्रार होती, ती त्यांनी व्यासपीठावरून उघडपणे ऐकवली. ‘आम्ही तीस-तीस वर्षे शिवसेनेसाठी काम करत आहोत. पण, मुंबईत गेल्यावर आम्हाला कोणी भेटत नाही. अपवाद फक्त एकनाथ शिंदेंचा होता. म्हणून आता आम्ही शिंदे गटात सामील झालो आहोत’, असे मध्यप्रदेशचे राज्यप्रमुख धाडेश्वर महादेव म्हणाले. हाच मुद्दा अन्य काही राज्यप्रमुखांनीही मांडला. एक राज्यप्रमुख भाषणात म्हणाले, ‘शिंदे गटाकडून आम्हाला संपर्क करण्यात आला, आम्ही दिल्लीला जाणार हे उद्धव ठाकरेंच्या गटाला कळलं असावं. त्यांच्याकडून आम्हालाही फोन आला होता. ते सांगत होते, तुम्ही मालकाला सोडून नोकराकडे कशाला निघाला आहात. आता सांगा, मालक-नोकर अशी भाषा कोणी करत असेल तर, कशाला त्यांच्या गटात रहायचे?’… शिवसेनेच्या राज्यप्रमुखांनी दिल्लीत जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केलेली टीका ही शिंदे गटाने दिलेली चपराक होती.

हेही वाचा : शिवसेनेसाठी आर पारची लढाई….

हिंदीतून केलेल्या भाषणात (अधूनमधून मराठीतही) ‘’नोकर’’ शब्दावरून शिंदेंनी दिलेले प्रत्युत्तर राज्यप्रमुखांशी नाळ जोडणारे होते. ‘(उद्धव ठाकरे) कार्यकर्त्यांना नोकर समजतात, स्वतःच्या कार्यकर्त्याची हीच किंमत करत असाल तर, कोण कशासाठी तुमच्यासोबत राहील’, असे शिंदे म्हणाले. मग, व्यासपीठावरील राज्यप्रमुखांना उद्देशून शिंदे म्हणाले, ‘तुम्ही आता माझ्यासोबत आहात, मी तुमच्यातील एक आहे. तुम्ही राज्या-राज्यात शिवसेना वाढवा. आमच्या काही नेत्यांना दोन-तीन राज्यांची जबाबदारी देतो. तेही तुमच्या संपर्कात राहतील. लोकांची कामे करा. शिवसेना देशव्यापी करा’…