ठाणे : राज्यात सत्ताबदलानंतर प्रशासनात प्रथमच मोठ्या प्रमाणावर खांदेपालट होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे, कोंडी आणि बेकायदा बांधकामांनी ग्रासलेल्या ठाणे शहराला विकासाचा ‘बांगर’ डोस देण्याचा प्रयत्न गुरुवारी केल्याचे दिसून आले. मागील दोन वर्षांत नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुशोभीकरण, रंगरंगोटी करत स्वच्छतेच्या आघाडीवर शहराचा नावलौकीक कायम ठेवण्यात अभिजीत बांगर यशस्वी ठरले आहेत. तसेच कोवीड काळातही वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना वेग देत महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालिन पालकमंत्री शिंदे यांची मर्जी राखण्यातही त्यांना यश मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे अल्पावधीतच शिंदे यांच्या खास गोटात स्थान मिळविलेल्या बांगर यांना महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यात आणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून यापुढील काळात वेगवान कामाच्या अपेक्षा ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असले तरी महापालिकेपुढील आर्थिक आव्हाने, नवी मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील किचकट राजकीय समीकरणे आणि दर्जाहीन कामांसाठी बदनाम असलेल्या ठाण्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बांगर या अपेक्षांना किती उतरतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>> ‘मिशन बारामती’ अंतर्गत फोडाफोडीला प्रारंभ

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

मुंबई पाठोपाठ बांधकाम क्षेत्राचे केंद्र म्हणून ठाणे ओळखले जाते. त्यामुळे ठाणे शहरातील महापालिकेत आयुक्तपदी येण्यासाठी अनेकदा प्रशासकीय वर्तुळात मोठी स्पर्धा असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ठाणे महापालिकेत सलग पाच वर्ष आयुक्तपदी रहाण्याचा ‘विक्रम’ संजीव जयस्वाल यांच्या नावावर नोंदवला गेला. बांधकाम क्षेत्राची मोठी उलाढाल असल्याने आर्थिक आघाडीवर देखील ‘प्रभावी’ ठरत असलेल्या या शहराचे आयुक्तपद इतक्या कमी वयात बांगर यांना मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामागे त्यांनी नवी मुंबईत बजावलेली कामगिरी आणि त्याहीपेक्षा नगरविकास तसेच पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून केलेले कामकाज निर्णायक ठरल्याचे बोलले जाते. राज्यात कोविडची साथ जोरात असताना अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करत त्यांच्या जागी बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही बदली सुरुवातीस पालकमंत्री असलेल्या शिंदे यांच्या पसंतीस उतरली नव्हती अशी जाहीर चर्चा होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासकीय सल्लागार अजोय मेहता यांच्या सल्ल्यानुसार ही बदली झाल्याने शिंदे सुरुवातीला काहीसे आक्रमक झाले होते.

हेही वाचा >>> काश्मीर बाहेर जाणारे सफरचंद प्रशासनाने रोखल्याने असंतोष वाढला

मिसाळ यांच्या बदलीस २१ दिवसांची स्थगिती देण्यात आली खरी मात्र दरम्यानच्या काळात अनेक सूत्रे हलली आणि अखेर बांगर नवी मुंबईत रुजू झाले. यानंतरची दोन वर्ष शिंदे यांचा शब्द प्रमाण मानत बांगर कार्यरत राहिले. या काळात नवी मुंबईत त्यांनी स्वच्छता, सुशोभीकरण आणि नागरिकांचा सहभाग या आघाडीवर केलेले काम वाखाणले गेले. कोविड काळातही मोठ्या प्रकल्पांचा पाळणा मोठ्या शिताफीने हलता ठेवण्याचे कसब त्यांनी दाखविले. त्यामुळे आधी नकोसे असलेले बांगर नंतर शिंदे यांच्या गळ्यातील ताईत बनले. ही मर्जी इतकी वाढली होती की गेल्या वर्षभरापासून बांगर ठाण्यात येणार अशी जाहीर चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात असायची. गुरुवारच्या प्रशासकीय खांदेपालटानंतर हा अंदाज खरा ठरला असून नवी मुंबईत केलेले धडाकेबाज काम महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बांगर यांनी करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, नवी मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील परिस्थिती सर्व आघाड्यांवर अधिक आव्हानात्मक असल्याने बांगर यांच्यासाठीही आगामी काळ कसोटीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शर्मा यांना बढती, नार्वेकरांचे पुर्नवसन

बांगर यांच्याकडे ठाणे सोपवत असताना मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेचे मावळते आयुक्त डाॅ.विपीन शर्मा यांच्याकडे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा महत्वाचा कार्यभार सोपवून अनेकांना बुचकळ्यात पाडले. ठाण्यातील कोविड परिस्थिती उत्तमरित्या हातळण्यात यशस्वी ठरलेले डाॅ.शर्मा पुढे मात्र विकासकामांचा अपेक्षित वेग राखू शकले नाहीत, अशा तक्रारी मुख्यमंत्री समर्थक गोटातूनच व्यक्त होताना दिसतात. समस्या पाहणीचे दौरे, विकास प्रकल्पांच्या आढावा बैठका घेऊनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचे चित्र होते. कामकाजाची फाईल काटेकोरपणे हाताळण्याचा त्यांचा स्वभावही अनेकांना जाचत होता. असे असताना त्यांना उद्योग विभागाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांना एकप्रकारे बढतीच मिळाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मागील चार वर्षापेक्षा अधिक काळात ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पद भूषविणारे आणि समन्वयाच्या कामकाजासाठी ओळखले जाणारे राजेश नार्वेकर यांनाही नवी मुंबईसारख्या आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि नियोजित शहराचे आयुक्तपद सोपवून त्यांचेही पुनर्वसन शिंदे-फडणवीस सरकारने मनाप्रमाणे केल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना नार्वेकर यांना मुंबई महापालिकेत महत्वाच्या ठिकाणी बदली मिळेल अशी चर्चा होती. त्यानंतर घडलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतरही नवी मुंबईची जबाबदारी सोपवून नव्या सरकारनेही त्यांची ‘सुरक्षित’ ठिकाणी पाठवणी केल्याचे बोलले जाते.