नागपूर : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राज्यात पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. ते करताना पारंपारिक पद्धतीला फाटा देत त्यांनी स्वत:चा असा सोशल कनेक्ट पॅटर्न तयार केला. त्यानुसारच त्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. सोमवारी त्यांनी नागपुरात सर्वोदय आश्रमात विविध क्षेत्रातील सामाजिक,राजकीय, कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला, अनेक वर्षानंतर काँग्रेस नेता सर्वोदय आश्रमात बसून राजकारणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील लोकांशी चर्चा करतो हे महत्वाचे आहे. सपकाळ याचा राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याचा प्रयत्न कितपत यशश्वी होतोय हे काळच ठरवणार असला तरी त्यांच्या या पॅटर्नची सध्या नागपुरात चर्चा आहे.
नवीन प्रदेशाध्यक्ष आले की त्याच्या स्वागत मिरवणुका काढणे, मेळावे घेऊन राजकीय टिकाटिप्पणी करणे, तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करून फावल्या वेळेत पक्षकार्यावर चर्चा करणे,असे सत्तेत असतानाच्या काळात काँग्रेसचे चित्र होते. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस सत्तेपासून दूर जाताच भरकटलेल्या स्थितीत होती. तेच ते नेते, तेच ते कार्यकर्ते, गटबाजी यामुळे नागपुरातील काँग्रेस पोखरलेली होती.
काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले, संस्थानिक झालेल्या नेत्यांनी अडचणीच्या काळात पक्षाकडे पाठ फिरवलेली. त्यामुळे नवीन नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला. जुने नेत्यांची मनमानी वाढली, अशा अशा परिस्थितीत सत्ता आणि संप्पती यातून बलाढ्य झालेल्या भाजपला तोंड कसे द्यायचे ,असा प्रश्न पक्षातील सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांना पडला होता. त्यांची उमेद वाढवतानाच प्रस्थापित नेत्यांना लगाम लावण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ यांनी स्वीकारली. ती पार पाडतांना त्यांनी स्वीकारलेली संवादावर आधारित पद्धती पक्षाचा‘सोशल कनेक्ट’ वाढवणारी ठरली. सोमवारी नागपुरातील सर्वोदय आश्रमात झालेला विविध क्षत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद हा ‘सोशल कनेक्ट’चाच भाग मानला जातो.
मान्यवरांचा सहभाग, कठोर प्रश्न
महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या सर्वोदय आश्रमात हा सवांद होणे याला जसे वेगळे महत्व आहे.तसेच ते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या समाजातील सर्व श्रेत्रातील मान्यवरांचेही आहे. त्यात लेखक , विचारवंत, सर्वोदयी कार्यकर्तेे, कृषी चळवळीतील नेते, पत्रकार आणि अन्य अनेकांचा त्यात समावेश होता. या सर्वांची उपस्थिती काँग्रेसबाबतची आस्था दर्शवणाराी होती. या सर्वांनी समाजाच्या विविध क्षेत्रात काम करताना त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारे व विद्यमान राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने काही प्रश्न सपकाळ यांना विचारले. काँग्रेस पक्षाची विचारधारा किती कार्यकर्त्यांना ठाऊक आहे ? नेहरू किती लोकांनी वाचलेलेआहे ? असे ते प्रश्न होते.
सपकाळ यांनी पूर्ण वेळ बसून सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणने ऐकून घेतले. एका राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत गैरराजकीय मंडळींचा हा संवाद असला तरी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी तो महत्वाचा ठरणारा आहे हे लक्षात घेऊन सपकाळ यांनी त्यांना विचारलेल्या कठोर व कान टोचणाऱ्या प्रश्नांनाही संयमाने उत्तर दिले. काँग्रेस अजूनही गांंधी विचारावर आस्था असणाऱ्या विविध सामाजिक संघटनांशी जुळून आहे हा संदेश सपकाळ यांनी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिला. सामाजिक संघटनांपासून काँग्रेस दुरावली ही संघटनांची नाराजीही त्यांनी दूर केली.
आताच संघटना का आठवल्या ?
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेवढा केला नव्हता तेवढा गांधी विचारावर आस्था असणाऱ्या संघटनांनी रस्त्यावर उतरून केला होता. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा अशाच विचारधारेच्या चळवळींमुळे २०१४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. तो ढासळल्यावर काँग्रेसला सामाजिक संघटनांची आठवण झाली. पुढच्या काळात महापालिका, जिल्हा परि,देच्या निवडणुका आहेत. हे सुद्धा कारण आहेच.