Maharashtra Municipal Council Elections 2025 स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुढे येताना दिसतोय. काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) व भारतीय जनता पार्टी या दोन मित्रपक्षांमध्ये संघर्ष चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील काही नेते, पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, तर काही भाजपा नेत्यांनी शिवसेना शिंदेंच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढला आहे.

ठाण्यातील एका शिवसैनिकाच्या म्हणण्यानुसार, “ही लढाई पॅनेल, प्रकल्प आणि वॉर्डवर आधारित आहे, दिल्ली किंवा मुंबईतील युतीवर नाही.” भाजपा आपला मित्रपक्ष असला तरी पक्ष आपली जागा कशी सोडू शकतो, असा प्रश्नही त्यांनी केला. ठाणे जिल्ह्यासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. इथेच त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात संघर्ष पेटला आहे. आरोप आणि प्रत्यारोपांमुळे तणाव इतका वाढला की, नुकतीच शिंदे यांना दिल्ली वारी करावी लागली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचीही माहिती आहे. महायुतीत हा तणाव असला तरी शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही युती कायम असल्याचा दावा केला आहे. ठाण्यातील हा तणाव भाजपा आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वासाठी चाललेल्या जुन्या स्पर्धेतून उदभवला आहे. दोन्ही पक्षांच्या जिल्हा नेतृत्वाच्या माहितीनुसार, जवळपास प्रत्येक महापालिका वॉर्डात दोन्ही पक्षांकडून समांतर मोर्चेबांधणी, प्रचारसभा, शाखा बैठका, गुप्त भेटीगाठी आणि प्रतिस्पर्धी गटातील समर्थकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना-भाजपामधील हा वाद विकोपाला जाणार का? नेमकी स्थिती काय? समजून घेऊयात…

वादाची ठिणगी आणि पक्षांतर

उल्हासनगरमध्ये भाजपाच्या पाच नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने तणाव वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. या पाच नगरसेवकांमध्ये जमनू पुरस्वानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी व मीना सोंदे यांचा समावेश आहे. शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे पक्षात स्वागत केले. या क्षेत्रातील प्रमुख सिंधी चेहऱ्यांपैकी एक मानले जाणारे पुरस्वानी यांनी पक्षांतराचे कारण स्पष्ट केले. जुन्या कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष, ठाणे भाजपा युनिटच्या निर्णय प्रक्रियेतील समस्या आणि स्थानिक प्रकल्प थांबणे, ही आपल्या पक्षांतराची कारणे असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

पुरस्वानी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “राज्यातील भाजपा नेतृत्वाशी आमचा काही प्रश्न नाही; पण स्थानिक पातळीवरील नेत्यांशी आहे. मी तीन-चार दशकांपासून भाजपाशी जोडलेला आहे; पण आता आम्हाला विचारल्याशिवाय नवीन चेहऱ्यांना जिल्हास्तरीय कोअर कमिटीत स्थान दिले जात आहे. जुन्या नेत्यांना तिकीटही नाकारले जात आहे. आम्ही अनेकदा हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता.”

पुरस्वानी यांनी स्पष्ट केले, “शिवसेनेतून कोणीही आमच्याशी संपर्क साधला नव्हता. उलट, शिंदेंनी आम्हाला भाजपामधून राजीनामा देण्यापासून थांबवण्याचा प्रयत्नही केला; पण आम्ही त्यांना आमची परिस्थिती समजावून सांगितली आणि उल्हासनगर महापालिकेत युतीची ताकद कमी होऊ नये म्हणून त्यांनी आमच्या प्रवेशाला सहमती दिली.” त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उलट पक्षांतर झाले.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनीता पाटील आणि सायली विचारे, तसेच तालुकाप्रमुख महेश पाटील आणि उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी बेहनवाल व त्यांचे पती मनोहर यांच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावली. त्यावरून शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी इशारा दिला, “केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असले तरी त्यांनी (भाजपाने) पक्षांतराचे राजकारण करण्यापूर्वी दोनदा विचार करावा.” त्याला उत्तर देताना भाजपाचे नेते नरेंद्र पवार म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत नंबर १ असलेल्या भाजपावर टीका करण्याऐवजी शिवसेनेने आधी आपले घर सांभाळावे.”

वैयक्तिक वैर

भाजपात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी बेहनवाल आणि त्यांचे पती मनोहर यांच्यावर कथितरीत्या शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मनोहर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, त्यांनी शिवसेना कल्याण शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या वृत्तीमुळे पक्ष सोडला. ते आम्हाला काम करू देत नव्हते आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत होते. खरे तर, शिंदेसाहेब आणि श्रीकांत (शिंदे) हे उत्तम नेते आहेत, जे कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देतात.”

मागील वर्षी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणमधील पोलीस ठाण्यात शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटनादेखील या भागात तणावाचे कारण ठरली होती. एका भाजपा नगरसेवकाने सांगितले, “निवडणुकीपूर्वी पक्षांतर करणे सामान्य आहे; पण या वेळी अविश्वास खूप जास्त आहे. प्रत्येक पक्षांतराकडे सूडभावनेतून पाहिले जात आहे.”

सातत्याने होणाऱ्या पक्षांतराचे कारण काय?

दोन्ही पक्षांतील नेते महापालिकेतील ‘पॅनेल सिस्टीम’ला पक्षांतराचे मुख्य कारण मानतात. या निवडणुकीपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली असून, त्यात चार नगरसेवकांचा समूह (‘पॅनेल’) एका वॉर्डात निवडणूक लढवतो. मुंबई वगळता, उर्वरित २८ महापालिकांमध्ये (जिथे पक्षचिन्हावर निवडणुका होतात) अशा चार सदस्यीय पॅनेलची पद्धत असेल. एका भाजपा पदाधिकाऱ्याने सांगितले की, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, पॅनेल मजबूत करण्यासाठी त्याला आपल्या बाजूला खेचण्याची धडपड सुरू आहे. “मजबूत पॅनेलमध्ये स्थान मिळविण्यासाठी लोक पक्ष बदलत आहेत,” असे ते म्हणाले.

शिंदे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याच्या मते, “या सिस्टीममुळे निवडणुकीपूर्वीचे वातावरण गोंधळाचे झाले आहे. कोणाला कोणत्या बाजूने चांगली संधी मिळते, याच्या शोधात प्रत्येक जण आहे.” दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तडजोड करण्याचा प्रयत्न झाला होता; पण अनेक प्रश्न पूर्णपणे सुटले नव्हते. कल्याण-डोंबिवलीतील महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, “मंत्रालयीन स्तरावर, राज्य आणि केंद्रात युती ठीक असेल; पण वॉर्ड स्तरावर स्पर्धा कधीही थांबली नाही.”

मुख्य म्हणजे आता प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यात थेट स्पर्धा आहे; तर ठाणे आणि नवी मुंबई शहरात भाजपाचे मंत्री गणेश नाईक आणि ठाण्याचे भाजपा आमदार व नेते संजय केळकर हे आपला प्रभाव वाढवण्यासाठी जोर लावत आहेत. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, या कृतींमुळे स्थानिक समीकरण बिघडले आहे. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर काम केलेल्या एका स्थानिक नेत्याने सांगितले, “दोघांनाही या भागावर नियंत्रण हवे आहे. दोघांचेही नेटवर्क मजबूत आहे आणि दोघांनाही केडीएमसी (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका)मध्ये पूर्ण वर्चस्व हवे आहे.”

या नेत्याने पुढे सांगितले, “श्रीकांत कल्याणचे खासदार आहेत; तर चव्हाण डोंबिवलीचे आहेत. मराठी आणि ब्राह्मण लोकसंख्येमुळे डोंबिवली हा भाजपाचा गड मानला जातो.” ठाणे शहरात नाईक आणि केळकर यांच्या आक्रमकतेमुळे भाजपा कार्यकर्ते आणि शिंदेसमर्थकांमध्येही वाद झाले आहेत. एका वरिष्ठ भाजपा पदाधिकाऱ्याने मान्य केले, “हे जुने वाद आहेत; पण पूर्वी एक मर्यादा होती. आता ती मर्यादा राहिलेली नाही.” एका स्थानिक शिवसेना नेत्याने सांगितले, “महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. युतीच्या लेबलपेक्षा तिकीटवाटप आणि पॅनेलमध्ये मिळणारे स्थान अधिक महत्त्वाचे असते.”

मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीला बहुतांश शिवसेना मंत्र्यांची अनुपस्थिती या मतभेदांना राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली. संजय शिरसाट यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी पक्षांतरामुळे असलेल्या नाराजीतून ही कृती केल्याचे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली. या भेटीनंतर दोन्ही बाजूंनी पदाधिकाऱ्याना पक्षांतर टाळण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांना वैयक्तिकरीत्या प्रवेश देताना दिसू नये, असे पक्षनेत्यांना सांगण्यात आले. परंतु, जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, हे बोलणे सोपे आहे; पण करणे कठीण आहे. डोंबिवलीतील एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितले, “हा निर्णय ठीक आहे; पण अविश्वास तर आधीच निर्माण झाला आहे.”