मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी निवडणुकीच्या तारखा आणि जागावाटपांच्या चर्चेत दंग असताना या सत्तानाट्याचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत. आत्तापर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडींची नांदी लवकरच रंगभूमीवरही होणार असून सध्या दोन नवीन नाटकांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला काही सांगायचंय-एकनाथ संभाजी शिंदे’ हा दीर्घांक आणि लोकनाट्याच्या शैलीतील ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नवीन नाटके रंगभूमीवर लवकरच दाखल होणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ हा चित्रपट पडद्यावर आला. शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चरित्र उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील सत्ताकारणात प्रचंड उलथापालथ झाली. आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती अधिक सविस्तरपणे उलगडणारा ‘धर्मवीर २’ हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याबद्दल उत्कंठा असताना आता रसिकांना रंगभूमीवरही हे नाट्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ हे नाटक डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिले असून ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते अशोक समेळ, त्यांचे चिरंजीव अभिनेता संग्राम समेळ हा दीर्घांक सादर करणार आहेत. या नाटकाचे अन्य तपशील लवकरच अधिकृतरित्या जाहीर करण्यात येतील, असे समेळ यांनी स्पष्ट केले.

‘५० खोके एकदम ओके’ या शीर्षकावरूनच विषय स्पष्ट करणारे नवे नाटक म्हणजे लोकनाट्य असल्याची माहिती नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले यांनी दिली. अनेक वर्षांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाच्या तोडीचे लोकनाट्य ‘५० खोके एकदम ओके’ या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता येईल, असा विश्वास गोडबोले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Haryana Election : हरियाणात भाजपाला आणखी एक धक्का; राज्य महिला मोर्चाच्या सरचिटणीस गायत्री देवींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यातील सत्तानाट्याचे पडसाद कलाक्षेत्रावरही पडताना दिसत आहेत. ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘५० खोके एकदम ओके’ ही दोन नाटक रंगभूमीवर लवकरच दाखल होणार आहेत.

‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ या दीर्घांकाची कल्पना मला सुचली. मी कोणाच्याही दबावाखाली येणारा कलाकार नाही. एक कलाकार म्हणून मला सद्या राजकारणाविषयी जे वाटते ते या दीर्घांकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अशोक समेळ, ज्येष्ठ नाटककार