ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीतील भूमिकेवर भाष्य केले. शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार विनायक राऊत यांनी सुनेने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून ९० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे पुकारलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला. महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राज्यातील पाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी…
“शरद पवार महाविकास आघाडीला…”, संजय राऊत
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य केले. कर्जमाफीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शरद पवार यांनी कौतुक केलं, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चालले आहेत. पवार साहेब सगळ्यांचे आहेत. ते तटस्थ भूमिका सध्या बजावत आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. शरद पवार महाविकास आघाडीला सोडून कधीही वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची विचारधारा वेगळ्या पद्धतीची आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले की बावनकुळे मुख्यमंत्री होतील”, असे म्हणत संजय राऊत यांनी विषयांतर केले.
विनायक राऊतांचे सुनेच्या आरोपांवर स्पष्टीकरण
शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सूनेने गंभीर आरोप करत कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून विनायक राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
विनायक राऊत म्हणाले, “गिरीजा राऊत म्हणाली की बुवा-बाबाकडे जाताना ती आई-वडिलांना घेऊन जात होती. प्रत्येक वेळी ते बरोबर येत होते, आई-वडील सज्ञान आहेत. एकदा गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात का धाव घेतली नाही?”
ते पुढे म्हणाले, “गिरीजा राऊत यांनी तक्रारीतच म्हटलंय की २९ डिसेंबर २०२३ रोजी स्वतःहून माहेर गेली. जाताना डॉक्टरांनी सांगितलं की म्हणून स्त्रीधन घेऊन गेले. १०-१२ बॅगा भरतील एवढे कपडे आणि स्त्रीधन किती नेलं हे तिने जाहीर करावं. सासरी येताना किती आणलं होतं आणि नेताना किती नेलं हे जाहीर करा. तिच्या नशिबात होतं, तेवढं तिला स्त्रीधन मिळालं आहे, ते आम्हाला परत नाही मिळालं तरी चालेल.”
“वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग…”, रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून ९० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला लक्ष्य करत महिलांना योजनेतून वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून ‘X’ वर लिहिलेल्या पोस्टमध्ये “काय ओ भाऊराया, आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय? तुम्हाला लाडक्या बहिणी जड झाल्यात का? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको का झाल्या?” असा उपरोधिक सवाल करत रोहिणी खडसे यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्याचे आश्वासन देत ‘लाडकी बहीण’ योजना मोठा गाजावाजा करुन राबविण्यात आली. मात्र, सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा
नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषण पुकारलं आहे. या उपोषणाला जवळपास १६ दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान, सोनम वांगचूक यांची प्रकृतीही बिघडली असल्याचं वृत्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांना पाठिंबा दर्शवला असून त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहनही केलं आहे. “गेल्या महिन्यापासून हा विषय चालू आहे. दिल्लीत जंतर मंतर येथे अभिजीत दिपके यांनी जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. सरकारला वेळ नाही. सत्ताधारी पक्षाला पक्ष फोडीत जास्त रस आहे. जिथे देशाचं नशीब फुटत आहे, विद्यार्थी आत्महत्या करत आहे, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे या आंदोलनाला आणि सोनम वांगचूक यांना पूर्ण पाठिंबा देण्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक असलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांना सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने विष्णुनगर पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. कातकाडे यांच्यासमोर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजर केले. न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकार पक्षाचे उक्तीवाद ऐकून रमेश म्हात्रेंसह तीन आरोपींना २४ जुलैपर्यंत (शुक्रवार) न्यायालयीन कोठडी सुनावली. शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत रुग्णालयात येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत डॉ. बाविस्कर यांच्याबरोबर मारहाण, अरेरावी, तर डॉ. साळुंके यांना म्हात्रेंसह त्यांचे समर्थक रमेश लक्ष्मण पवार, प्रमोद उर्फ प्रकाश उध्दव निकम, अक्षय शरद कारंडे यांनी जीवघेणी मारहाण केली होती. डॉ. साळुंके यांच्या डोक्यात जाडजूड नस्तीचे फटके मारले होते.
