आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तब्बल २५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला… काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यात भाकरी फिरवताच पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले… विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली… हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीसांनी फक्त दोन दिवस माझ्यासारखं उन्हात बसून दाखवावे, असे खुले आव्हान मनोज जरांगे यांनी दिले… पुण्यातील विषारी दारुमुळे झालेल्या १४ जणांच्या मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदे गटात तब्बल २५००० जणांचा प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत तब्बल २५ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या पक्षप्रवेशाची माहिती दिली. शिंदेसेनेत सामील झालेले बहुतांश पदाधिकारी हे विरोधकांच्या महाविकास आघाडीतील असल्याचे सांगितले जात आहे. या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या ३० जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यात भाकरी फिरवताच पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना पदावरून हटवून त्यांच्याऐवजी अॅड विश्वजित कोवासे यांची नियुक्ती केल्याने पक्षात राजकीय वाद उफाळून आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आम्ही थेट दिल्लीला जाणार, असाही इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. तसेच संघटनेला उभारी देणाऱ्या नेतृत्वाला डावलून केलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेतृत्वा विरोधात उघड बंड पुकारले. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथे इतर मागासवर्गीय समुदायातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. तरीही पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर एका विशिष्ट समाजातील नेत्यांनाच प्रतिनिधित्व दिले जात असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला. एकाचवेळी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या बंडामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

जरांगेंचे फडणवीसांना पुन्हा खुले आव्हान

हिंमत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त दोन दिवस माझ्यासारखे उन्हात बसून दाखवावे, असे खुले आव्हान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिले. मला रखरखत्या उन्हात आंदोलन करण्याची हौस नाही, पण सत्तेत बसलेले लोक मराठा समाजाची क्रूर अग्निपरीक्षा घेत आहेत. आंदोलन मोडीत काढण्याची भाषा आणि दादागिरी आता त्यांनी बंद करावी, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाहीर पत्रकार परिषद घेतली. येत्या ३० मेपासून सुरू होणाऱ्या आपल्या सर्वात कठोर आमरण उपोषणाच्या भूमिकेवर आपण १०० टक्के ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारकडून माझ्याशी चर्चा करण्यासाठी कोण येणार आहे हे मला माहिती नाही. पण उद्या कुणीतरी आले की- त्यांचे म्हणणे नक्कीच ऐकून घेतले जाईल, मात्र उपोषण कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या १५ जागांवर मविआचे एकमत

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे एकमत झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. १७ पैकी १५ जागांवर आमचे एकमत झाले असून त्याम काँग्रेस आठ, ठाकरे गट चार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तीन जागांवर लढणार आहे, तर उर्वरित दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील घटकपक्षांतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस विधान परिषदेच्या चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा या तीन जागा आणि उद्धवसेना रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जागा जागा लढवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुण्यात विषारी दारुमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील असून, कोणाचीही गय करू नका अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत. पुण्यात ४८ तासांत १४ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यात पिंपरी -चिंचवडमध्ये ९ तर पुण्यातील हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ नागरिकांचे मृत्यू हे विषारी दारुमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणाच्या साखळीचा शोध देखील घेतला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.