Ajit Pawar Death Rashtrawadi Congress : कुटुंब आणि व्यक्तिकेंद्री राजकारणाने व्यापलेल्या पक्षात आणि राज्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहतो. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील गदारोळात अधिकच भर पडेल त्याचप्रमाणे राज्य, पक्ष आणि पवार कुटुंबालाही दीर्घकाळ एक पोकळी जाणवत राहील.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिलेल्या विशेष लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, काल बुधवारी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले दुर्दैवी निधन ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नाही, तर आपल्या काळातील एका महत्त्वाच्या राजकीय कारकिर्दीचा अचानक पडलेला पडदा आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसपासून शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत, आणि पुढे त्यांनीच नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीर गटाला भाजप- नेतृत्वाखालील एनडीएमध्ये नेण्यापर्यंत अशा विविध पक्षीय टप्प्यांतून गेलेले अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि आठ वेळा आमदार राहिले. विचारसरणीच्या ठरावीक चौकटी ओलांडत, जमिनीवरचा थेट संपर्क टिकवून ठेवणाऱ्या व्यवहारवादी राजकारणाचा ते एक ठळक प्रतिनिधी होते.

मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या या नेत्यासाठी त्यांच्या निधनाने भविष्यातील शक्यता अचानक संपुष्टात आल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या फाटाफुटीनंतर सुरू झालेली राजकीय घुसळण अजूनही संपलेली नाही. या फाटाफुटींनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख राजकीय आघाड्यांची पुनर्रचना घडवून आणली. अवघ्या पंधरवड्यापूर्वी झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येताना दिसल्या आणि त्याच वेळी महायुतीतील अंतर्गत तणावाच्या चर्चांनाही जोर आला.

Remembering Ajit Pawar
शासनावर दरारा निर्माण करणारे अजितदादा

१९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येत अजित पवारांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. पुढे हीच जागा त्यांनी शरद पवारांसाठी रिक्त केली, जेणेकरून शरद पवार राज्याच्या राजकारणात स्थिरावू शकतील. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेले असतानाही, कामे करून दाखवणारा प्रशासक आणि आर्थिक शिस्तीवर ठाम राहणारा अर्थमंत्री अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मात्र त्यांचा थेट, कधी कधी बेधडकपणे व्यक्त होणारा स्वभाव आणि काहीसा उतावळेपणा अनेकदा वादग्रस्त ठरला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर पहाटेच्या वेळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ आणि अवघ्या ८० तास टिकलेले सरकार हा त्यातीलच एक प्रसंग. तसेच तीव्र पाणीटंचाईच्या काळात केलेली काही वक्तव्येही चुकीच्या वेळची आणि सूर चुकलेली म्हणून टीकेचा विषय ठरली.

सत्ता ही त्यांना कौटुंबिक वारशातून मिळाली, हे नाकारता येणार नाही. मात्र शरद पवार दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणात अधिक गुंतत गेले, तसतसे पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील सत्ता अजित पवारांनी आपल्या पद्धतीने घडवली. ‘अजितदादा’ म्हणून ओळखले जाणारे हे नेतृत्व संघटना टिकवून ठेवणारे होते. दूध संघ, साखर सहकारी संस्था यांच्याशी थेट संवाद राखणारे आणि इतर पक्षांशीही व्यवहारिक समन्वय साधणारे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आपले भवितव्य अजित पवारांशी जोडले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांतील त्यांच्या गटाची कामगिरी पाहता, ‘खरी राष्ट्रवादी’ आपल्याच नेतृत्वाखाली आहे, हा त्यांचा दावा अधिक ठोस झाल्यासारखा वाटत होता.

अजित पवार यांच्या अकाली निधनाने ते माधवराव सिंधिया, वाय. एस. राजशेखर रेड्डी, प्रमोद महाजन आणि अलीकडेच दिवंगत झालेले विजय रुपाणी यांच्यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत, जे आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाच काळाच्या पडद्याआड गेले. कुटुंब आणि व्यक्तिमत्त्वाभोवती फिरणाऱ्या पक्षात आणि राजकारणात, त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासंबंधी मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही पोकळी केवळ पक्षापुरती मर्यादित नाही; महाराष्ट्राच्या सतत बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये आणि पवार कुटुंबातही त्यांच्या अनुपस्थितीने अस्थिरता अधिक तीव्र होणार आहे.