Maharashtra Political News : जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला. भुजबळांसारखा मातब्बर नेता मंत्रिमंडळात दाखल झाल्यानं महायुती सरकारची ताकद वाढली आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप झाल्यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनामुळे ही पोकळी भरून निघेल अशी शक्यता आहे. यादरम्यान, धनंजय मुंडे हेदेखील काही दिवसांतच मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांनी मंगळवारी (तारीख २० मे) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होतं. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. हेच खातं छगन भुजबळ यांना मिळणार, असा अंदाज बांधला जात आहे. त्यावर बोलताना “मला वाटतं कोणी कोणाला रिप्लेस करू नये. अशी रिप्लेसमेंट असेल तर त्यांना ओबीसींचा विश्वास कधीही मिळणार नाही. भुजबळांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. स्वतःची ओबीसीची ठाम भूमिका आहे. धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून भुजबळांना दिलं असेल तर ते ओबीसींना आवडणार नाही. मुंडे काही दिवसात राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील, हे मी महाराष्ट्राला जबाबदारीने सांगतो,” असं हाके यांनी म्हटलं आहे.
“रोहित पवार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार”

लक्ष्मण हाके यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या कॅबिनेटमधील समावेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच जी माणसं ओबीसींच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतील, त्या सर्वांचे आम्ही स्वागत करू आणि जे या धोरणाच्या आड येतील त्यांना आम्ही कडाडून विरोध करू… मग ती कोणत्याही पक्षाची असो… आमचे प्राधान्य फक्त ओबीसींना आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं?

“पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजून काही मंत्री येणार आहेत. सध्या ‘वेट अँड वॉच, डॅमेज कंट्रोल’ सुरू आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील, रोहित पवार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, तर देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांची वर्णी लागणार आहे. आमचा प्रश्न एकच आहे, आमच्या ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत”, असेही हाकेंनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना, “त्यांना फक्त भुजबळच दिसतात. बाकीचे दिसत नाहीत. दमानिया, मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ नावाची कावीळ झालेली आहे. त्यांना इतर मंत्री दिसत नाहीत का?” अशी टीका हाके यांनी केली आहे.

भुजबळांनी अजित पवारांवर केली होती टीका

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर मंत्रिमंडळातील काही जुन्या व वजनदार नेत्यांना अनपेक्षितपणे डावलण्यात आले. त्यात छगन भुजबळ यांचाही समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेरच्या क्षणी छगन भुजबळांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवत धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मंत्रिपदाची माळ टाकली होती. विशेष बाब म्हणजे, त्यावेळी भुजबळांकडे असलेलं खातंही मुंडेंनाच देण्यात आलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्यानंतर भुजबळ यांनी प्रचंड आदळआपट केली. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांवरच टीकेची झोड उठवली होती.

“धनंजय मुंडे काही दिवसांत मंत्रिमंडळात दिसतील”

बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा हे खातं भुजबळ यांनाच मिळेल अशी अटकळ बांधली जात आहे. दुसरीकडे येत्या काही दिवसांत मुंडेही मंत्रिमंडळात दिसतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खरंच मंत्रिपद मिळणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे गटात; मुंबई महापालिकाही ताब्यातून जाणार?

धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणासह करुणा शर्मा-मुंडे प्रकरणही भोवल्याची चर्चा आहे. करुणा शर्मा यांनी मुंडेंविरोधातील माझगाव कोर्टातील खटलाही जिंकला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंविरोधात काहीसं रोषाचं वातावरण आहे. तिथे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची धग अजूनही धुमसत आहे. त्याचवेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळातील कथित घोटाळ्यांचा लेखाजोखा धस यांनी माध्यमांसमोर सांगितलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्री?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला पार पडला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या सरकारमध्ये महायुतीतील घटकपक्षांच्या एकूण ३९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये भाजपाचे १९, शिवसेना शिंदे गटाचे ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. दरम्यान, छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणं कठीण झालं आहे. धनंजय मुंडे यांचेही मंत्रिमंडळातील पुनरागमन पुढील पाच वर्षांसाठी संपुष्टात आल्याची चर्चा आहे.