मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शरद पवार तर विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या बिनविरोध निवडीमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीत फायदाच झाला आहे. तर महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही काँग्रेसच्या हाती काहीच लागलेले नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली होती. पण उद्धव ठाकरे यांनी स्वत: न लढता परस्पर अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. शेवटी शिवसेनेच्या नेत्यांना राज्यातील काँग्रेस नेत्यांची समजूत काढण्यात कसेबसे यश आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसने उमेदवार उभा करू नये म्हणून पक्षाचे दिल्लीतील नेते के. सी. वेणूगोपाळ तसेच राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्याचा निरोप ठाकरे यांना देण्यात आला. मग अनिल परब, अनिल देसाई, अंबादास दानवे आदींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली.

दोन वर्षांनंतर होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी जागा काँग्रेसला सोडण्याचे आश्वासन शिवसेनेच्या वतीने आता देण्यात आले. या निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. या दोन वर्षांत राजकीय संदर्भ बदलू शकतात. यामुळेच दोन वर्षांनंतर होणारी राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन याला काहीच अर्थ नाही. राजकारणात आज दिलेले आश्वासन उद्या पाळले जात नाही. त्यातच शिवसेनेचे संजय राऊत तेव्हा निवृत्त होतील. संजय राऊत सहजासहजी दावा सोडण्याची शक्यता नाही.

राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही काँग्रेसने कठोर भूमिका घेतली होती. शरद पवार यांना पाठिंबा देण्यास काँग्रेस नेत्यांचा आक्षेप होता. तेव्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती. पण शरद पवारांनी थेट दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधल्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. विधान परिषदेच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून काँग्रेसने माघार घेतली.

महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांचीच निवड झाली. विधान परिषदेत अंबादास दानवे यांची बिनविरोध निवड झाल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचे आमदार असूनही काँग्रेसची झोळी मात्रक रिकामी राहिली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.

काँग्रेसची माघारीची हॅटट्रिक

राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासाठी काँग्रेसने माघार घेतली. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली होती. पण सर्वपक्षीय नेत्यांच्या विनंतीवरून काँग्रेसने अर्ज भरला नाही. विधान परिषदेसाठी उमेदवार उभा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण शिवसेनेने समजूत काढल्यावर माघार घेतली. अशा रितीने गेल्या महिनाभरात काँग्रेसने तिनदा माघार घेतली आहे.