भाजपाला शह देण्यासाठी इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी एकजूट दाखवली असली तरी प्रादेशिक पातळीवरील मतभेद मिटवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर कायम आहे. राज्यातील विरोधकांच्या महाविकास आघाडीलाही सध्या अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) एकजुटीचा नारा दिला होता. आता मात्र दोन मतदारसंघातील उमेदवारीवरून त्यांच्या एकीला तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याविषयी…
अमरावती शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. याशिवाय पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक या मतदारसंघातही निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पाचही जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच हे मतभेद उफाळून आले आहेत. यादरम्यान मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता, तर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ९ ऑक्टोबरची आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतानाही अमरावती आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांतील उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
अमरावतीत काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच
काँग्रेसने अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे, शिवसेना ठाकरे गटाने दत्तात्रय लहाने यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी ६ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे, काँग्रेसने ३ ऑक्टोबर रोजीच अदिती पोहरे यांच्यासह नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. अदिती पोहरे या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून त्यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या संस्थेच्या कर्मचारीवर्गात मोठ्या संख्येने शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे नोंदणीकृत शिक्षकांकडून पोहरे यांना स्थानिक पातळीवर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अमरावतीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटानेही दावा ठोकला आहे. दत्तात्रय लहाने यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर पक्षाने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. आमचा पक्ष अमरावती आणि मराठवाडा या दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही पक्षांतील नेत्यांची नेमकी भूमिका काय?
आम्ही नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्या पक्षाला देण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे अमरावती आणि मराठवाडा या दोन मतदारसंघांत आमच्या पक्षाचाच उमेदवार राहील, असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी हा अत्यंत कळीचा घटक असल्याचे सांगितले. या निवडणुका सामान्य मतदानासारख्या नसतात. ज्या बाजूने अधिक मतदार नोंदणी केली जाते, त्यांचे पारडे जड असते, असे ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा विद्यमान आमदार असताना काँग्रेसने त्यावर दावा केला नव्हता. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने ठाकरे गटानेही त्यावर दावा केला नव्हता. जेव्हा एखाद्या जागेवर विद्यमान आमदार असतो, तेव्हा दुसऱ्या पक्षाने ती जागा मागणे योग्य नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गट आणि शरद पवार गटातही रस्सीखेच
अमरावतीच्या जागेबाबत शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. सोमवारी पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षांनी ठाकरे गटाचे उमेदवार दत्तात्रय लहाने यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे दुसऱ्या एका स्थानिक नेत्याने सांगितले. या परस्परविरोधी भूमिकांमुळे अमरावतीच्या जागेबाबत शरद पवार गटातही अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील दुसऱ्या जागेचा वाद हा अधिक थेट स्वरुपाचा आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने दिलीप घुगे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार गटाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्याचा दावा छत्रपती संभाजीनगरमधील शरद पवार गटाच्या एका नेत्यांनी केला. या मतदारसंघात पक्षाने सलग तीन वेळा विजय मिळवला असल्याने यापुढेही ही जागा आमच्याच पक्षाला मिळायला हवी, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
तिन्ही पक्षांची आता थेट लढतीकडे वाटचाल?
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या मतभेदांना फारसे महत्त्व न देण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद जागांवरील मतभेदांबाबत विचारले असता, महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील चर्चेनंतर हा मुद्दा स्पष्ट होईल असेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी या जागेवरील शरद पवार गटाचा दावा फेटाळून लावला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला महाविकास आघाडीने २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाचही जागांवर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आघाडीच्या रणनीतीवर चर्चा झाली होती. आता मात्र दोन मतदारसंघांत ही सहमती निष्फळ ठरल्याचे दिसत आहे. आघाडी पातळीवरील अंतिम निर्णयाची वाट न पाहताच तिन्ही पक्षांनी परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट अशी मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही या लढती टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडे ९ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
