सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली आहे. सुमारे ७० टक्के लोकप्रतिनिधी विकले गेल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार जरांगे यांच्यासमोर लाचार झाले आहे, अशी घणाघाती टीका केली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या गटाला विदेशी निधी मिळतो का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केले. ५ घडामोडी जाणून घेऊयात.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार – सुप्रिया सुळे

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये. माझा तो स्वभाव देखील नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपाच्या विरोधात ताकदीने लढू. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला आहे, तो घोडेबाजार कसा झाला? याबाबत बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. “कोणत्याही निवडणुकीत होणारे घोडेबाजार बंद झाले पाहिजेत, त्यामुळे मी आता लवकरच संसदेत एक विधेयक मांडणार आहे. कोणतीही निवडणूक फक्त पैशांच्या जीवावर कोणीही लढू नये. तसचे कोणीही सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सची भिती देखील दाखवू नये”, असंही सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.

सुमारे ७० टक्के लोकप्रतिनिधी विकले गेले – विजय वडेट्टीवार

विधान परिषद निवडणुकीचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. या निवडणुकीचा अक्षरशः बाजार मांडला गेला आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाला असून सुमारे ७० टक्के लोकप्रतिनिधी विकले गेल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नगरसेवकांना लाखो रुपयांच्या ऑफर देण्यात आल्याच्या चर्चांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर भेदभावाचा आरोप केला. निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मते मागितली जातात; मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जाते, असे ते म्हणाले..राज्यातील ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सवलती दिल्या जात नाहीत. विविध समाजघटकांसाठी कार्यरत असलेल्या बार्टी, सारथी आणि इतर संस्थांना समान निधी देऊन समान विकास साध्य होऊ शकत नाही. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही; मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना अधिक शैक्षणिक सुविधा, आर्थिक मदत आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकार जरांगेंसमोर लाचार – लक्ष्मण हाके

मराठा समाजावर अशी कोणती वेळ आली, त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार जरांगे यांच्यासमोर लाचार झाले आहे, अशी घणाघाती टीका केली. तसेच मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या योजना राज्यघटनेचे उल्लंघन करणाऱ्या असून, त्याविरोधात न्यायालयीन लढाईसह तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने मराठा समाजासाठी आठ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रा. हाके यांनी पुण्यातील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांवरही टीका केली. राज्य सरकार ओबीसींचा वापर केवळ मतांसाठी करून घेत आहे. जे ओबीसींना तेच मराठा समाजाला असे सरकारने म्हणणे अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेल्या योजनांविरोधात न्यायालयात जाणार आहे, तसेच आंदोलन करणार आहे. ओबीसींच्या मनात सरकारच्या या धोरणांबद्दल प्रचंड चीड आहे. आम्ही कशाप्रकारे आमचा रोष दाखवून देऊ, हे येणाऱ्या काळात सरकारला कळेल, असेही त्यांनी सांगितले.

कॉक्रोच जनता पार्टीला परदेशातून मिळणाऱ्या निधीची चौकशी व्हावी – आमदार आशीष देशमुख

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक असले तरी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या गटाचे प्रमुख विदेशातून कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या गटाला विदेशी निधी मिळतो का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केले. संबंधित गटाला परदेशातून आर्थिक मदत अथवा निधी मिळतो का, हा चौकशीचा विषय असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. सोशल मीडिया माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यामागील आर्थिक स्रोत पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित यंत्रणांनी या बाबीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या कार्यपद्धतीवर टीका करताना डॉ. देशमुख यांनी वादग्रस्त भाष्य केले. “गटार तयार होत असेल, घाण तयार होत असेल तर त्यातून कॉक्रोच निर्माण होणारच,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

विधान परिषद निवडणुकीदरम्यान घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी एवढंच म्हणेल की माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि, या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे.” दरम्यान, सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “कोणत्याही निवडणुकीत होणारे घोडेबाजार बंद झाले पाहिजेत, त्यामुळे मी आता लवकरच संसदेत एक विधेयक मांडणार आहे. कोणतीही निवडणूक फक्त पैशांच्या जीवावर कोणीही लढू नये. तसचे कोणीही सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सची भिती देखील दाखवू नये”, असंही सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.