रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार केल्यानंतर आता भाजपने शेकापच्या ताब्यात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात सासवड ते कोंढवा हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरमधील कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे, त्यांचे पुत्र अखिलेश, विरेंद्र घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या वाढली आहे. गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. महाराष्ट्रातील पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.

भाजपा आमदाराचा हिंदू जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखला

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात सासवड ते कोंढवा हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी पडळकर यांच्या मोर्चाला कोंढव्यात प्रवेश करण्यापासून रोखले. भिवरी गावातील काही तरूणांवर दाखल झालेले गुन्हे, कानिफनाथ मंदिर परिसरात मुस्लिम समाजातील तरूणांकडून नमाज पठण तसेच जमीन बळकावण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कोंढवा परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी व रोहिंग्या राहतात, त्यामुळे पोलिसांनी कोंढव्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी पडळकरांनी केली आहे. दरम्यान, पुण्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमदार पडळकर यांच्या मोर्चाला रोखण्यात आले होते.

समरजीत घाटगे यांचा भाजपामध्ये प्रवेश

कोल्हापूरमधील कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे, त्यांचे पुत्र अखिलेश, विरेंद्र घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे. घाटगे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

बारामतीत निम्मे उमेदवार बाहेरचे, करूणा मुंडे यांचीही उमेदवारी दाखल

बारामतीत कोणतीही निवडणूक असली, तरी निकाल काय लागणार, हे माहीत असल्याने उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र, या वेळची स्थिती निराळी असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याची चर्चा सुरू होताच उमेदवारांची संख्या वाढली आहे. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ५३ उमेदवार रिंगणात असून, निम्मे उमेदवार हे बारामतीबाहेरील आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे उमेदवारी मागे घेण्यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होणार असले, तरी बाहेरील उमेदवारांपैकी धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांचा अर्ज मागे घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसते.

प्रफुल्ल पटेलांच्या मेळाव्यात बॅनरवर अजितदादांचा फोटो नसल्याने तर्कवितर्क

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या अधिकृत फलकावर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, हा मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या गोंदिया या गृह जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर फलकावर फक्त खासदार प्रफुल पटेल यांचेच छायाचित्र ठळकपणे झळकले. माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो नव्हता.

भाजपचा शेकापला आणखी एक दणका

रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार केल्यानंतर आता भाजपने शेकापच्या ताब्यात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्हा परिषदेच्या करोडो रुपयांच्या ठेवी काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. भाजपचे कृषी व पशूसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी हा ठराव सभागृहासमोर मांडला. त्यास मंजूरी देण्यात आली. भाजपाने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेचा कारभार त्यांनी अतिशय नेटाने चालविला आहे.