गेल्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुवाहाटीला गेले होते. तिथे पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर पक्षाच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राची प्रत आली. या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी देण्यात आली होती. मात्र, त्यात आपली नावे नसल्याचे पाहून दोन्ही नेते चकित झाले. विशेष म्हणजे, तटकरे आणि पटेल ज्या विमानाने गुवाहाटीला आले होते, त्याच विमानातून सुनेत्रा पवार यादेखील प्रवास करत होत्या. तरीही त्यांनी या निर्णयाबाबत दोन्ही नेत्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.

पार्थ आणि जय पवारांना महत्वाची पदे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फेरबदलांचा हा धक्का केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर पक्षातील इतर अनेक बड्या नेत्यांनाही यातून बाजूला सारण्यात आले. पक्षातील या १२ सदस्यीय राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनाही स्थान मिळालेले नाही. याउलट, सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पुत्र राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांची अनुक्रमे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रवादीच्या २२ सदस्यीय कार्य समितीच्या एका वेगळ्या यादीत आहेत, मात्र, त्या यादीतही त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी रात्री आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली.

सुनेत्रा पवार यांच्याकडून सारवासारव

इंटरनेटवर फिरत असलेल्या या याद्यांमध्ये काही चुका झाल्या असून, लवकरच त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, असे असले तरी, या याद्यांवरून सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी पक्षावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पक्षाशी जोडले गेलेले अनेक वरिष्ठ नेते या नव्या नेतृत्वाच्या जवळच्या गटात दिसत नाहीत. तसेच, त्यापैकी कोणालाही राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून स्थान देण्यात आलेले नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याची चर्चा सध्या पक्षात जोरात असून, हा निर्णय म्हणजे सुनेत्रा पवार यांनी पक्षावर आपल्या कुटुंबाचे वर्चस्व कायम असल्याचा ठाम संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. “त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे, सांगितल्याप्रमाणे काम करा, अन्यथा कामच करूच नका,” असे राष्ट्रवादीच्या एका आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

राष्ट्रवादीतील अंतर्गत तणाव वाढला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या फेररचनेत शिवाजीराव गर्जे आणि जय पवार यांची पक्षाच्या मुख्य कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच, दिल्लीतील तुलनेने कमी परिचित असलेल्या काही नेत्यांनाही राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून संधी देण्यात आली. त्याशिवाय पवार कुटुंबातील नातेवाईक अभिषेक बोके आणि अविनाश आडिक यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून पदे देण्यात आली. “या वादाची पाळेमुळे अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतरच्या घडामोडींमध्ये आहेत. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली होती,” असे राष्ट्रवादीतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचाही उल्लेख केला. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याविरोधात हा एक प्रकारचा बंडखोरीचा प्रयत्न असल्याचे समजले जात होते, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सुनेत्रा पवार यांचा ‘मास्टरस्ट्रोक’

दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे गटाने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीच्या सुधारित पक्षघटनेची प्रत सादर केल्याची माहिती समोर आली. या मसुद्यात पक्षाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना समान अधिकार देण्याची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. आपले अधिकार कमी करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, २८ जानेवारी (अजित पवार यांच्या निधनाचा दिवस) ते २६ फेब्रुवारी (ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली) या महिनाभराच्या कालावधीत पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कोणत्याही पत्राची किंवा संवादाची दखल घेतली जाऊ नये. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे.

पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या अंतर्गत रचनेत त्याचे ३६ वर्षीय पुत्र पार्थ पवार यांचा प्रभाव कमालीची वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आता त्यांनाच अंतिम निर्णय घेणारे नेते मानले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांच्या दिमतीला तरुण नेते, व्यावसायिक आणि कायदेतज्ज्ञांची एक खास टीम कार्यरत आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ‘झीशान सिद्दीकी’ या तरुण नवख्या चेहऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन त्यांनी पक्षातील आपले राजकीय वजन आणि अधिकार सिद्ध केला आहे. दुसरीकडे, पवार कुटुंबाने आतापासूनच २०२९ च्या आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. जय पवार यांनी त्यांचे हक्काचे क्षेत्र असलेल्या बारामतीमध्ये दर गुरुवारी ‘जनता दरबार’ भरवण्यास सुरुवात केली आहे. याच बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी नुकताच विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे.

नेत्यांमधील वादामुळे कार्यकर्ते संभ्रमात

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या गटाचा असा दावा आहे की, अलीकडच्या काळात त्यांनी केलेल्या हालचाली सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात नव्हत्या, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाकडून पक्षाच्या विलीनीकरणाच्या वावड्या उठवल्या जात असल्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी ही पावले उचलण्यात आली होती. “अजित पवार यांच्या निधनाच्या दिवसापासूनच, आमच्या पक्षाचे विलीनीकरण होणार असल्याचा दावा विरोधी गटाकडून केला जात होता. तसे झाले असते, तर सुनेत्रा पवार यांच्या हातातून पक्ष निसटला असता. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी जे योग्य वाटले, तेच आम्ही केले,” असे तटकरे यांच्या एका निकटवर्तीय नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. पक्षातील दोन गटांतील वरिष्ठ नेत्यांमधील या तणावामुळे आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे २०२९ च्या निवडणुकांआधी आपल्या २२ आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचा हा दावा तटकरे आणि भाजपाच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे.

राष्ट्रवादीत अनेक महत्वाची पदे रिक्त

पक्षातील या वाढत्या संभ्रमाचा आणि अनिश्चिततेचा फटका आता राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे बसू लागला आहे. ठाण्यातील ज्येष्ठ नेते आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई अध्यक्ष, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुखांसारखी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, भाजपाकडून सुनेत्रा पवार यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते मिळवण्यातही यश आलेले नाही. हेच खाते पूर्वी अजित पवार यांच्याकडे होते. “पक्षासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. अजित पवार हे पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत होते. त्यांच्यामुळे आम्हाला मोठा आधार वाटत होता. आज ती भावना दिसत नाही. सध्याचे अंतर्गत तणाव कमी झाले नाहीत, तर पक्षाच्या खालच्या स्तरावरील नाराजी अधिक उघडपणे समोर येतील. तटकरे आणि पवार या दोन्ही गटांनी याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे,” असे राष्ट्रवादीच्या एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.