राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला सभेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. तर गॅस टंचाईवरून बच्चू कडू यांनी थेट परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. करोनापेक्षा भयंकर परिस्थिती देशात, राज्यात पाहायला मिळेल, असे काँग्रेस नेते बच्चू कडू म्हणाले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गॅसचे भाव वाढल्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली. बारामतीतील एका सभेत सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झाल्या. महाराष्ट्रातील आजच्या टॉप पाच घडामोडी जाणून घेऊयात.

माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला सभेसाठी परवानगी नाकारली

महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्य साधारण महत्व असलेल्या पुसद येथील नाईक कुटुंबियात सध्या राजकीय शह कटशहाचे राजकारण सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक यांच्या पुसद येथे होऊ घातलेल्या सभेस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने, या चर्चेस उधाण आले आहे. पुढील आठवड्यात शनिवार, २१ मार्च रोजी पुसद येथे निरंजन नाईक यांची ही सभा नियोजित आहे. मात्र सभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने शहरात खळबळ उडाली आहे. संत सेवालाल महाराज जयंतीवरून निर्माण झालेली समाजातील तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु, ‘शांतता व सुव्यवस्थेचे’ कारण देत तहसीलदार व क्रीडा समितीने सभेला मज्जाव केल्याने बंजारा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुसद शहरात सध्या ’सभा’ आणि ’परवानगी’ यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आपलं परराष्ट्र धोरण कमकुवत – बच्चू कडू

करोना काळात ज्या चुका केल्या त्याच चुका केंद्र सरकार आता करत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. आपलं परराष्ट्र धोरण कमकुवत असल्याचं सिद्ध झालं आहे, असे बच्चू कडू म्हणाले. “युद्ध होणार हे या दहा दिवसांत सरकारला समजले का? आपलं परराष्ट्र धोरण कमकुवत आहे, हे यावरून स्पष्ट होतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या युद्धाची माहिती केंद्रातल्या सरकारला माहिती नाही होणार, ही मोठी फजिती आहे. करोना काळात ज्या चुका केल्या त्या चुका युद्धकाळात होताना दिसत आहेत. विश्वगुरू म्हणवून घेणारे आता फसले, साधं सिलिंडर आणि पेट्रोलही त्यांना आता कमी मिळणार आहे. मिठावर पोर्तुगीज बंदी आणणार आहेत, हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळी त्यांनी मिठाचा साठा करून ठेवला होता. हे सरकार शिवाजी महाराजांच्या नीतीवर चालत नाही. भाजपा राष्ट्रप्रेमाचा ऊत आणत असेल तरी यावरून त्यांचं राष्ट्रप्रेम हे देखावा आहे हे स्पष्ट होतं”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

बारामतीतील कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावुक

बारामतीत ‘एन्वायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. भाषण करताना अजित पवार यांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक झाल्या. “फोरमच्या इतक्या वर्षांच्या जडणघडणीत अजितदादांचा वाटा खूप मोठा आहे. बारामतीकरांच्या आयुष्यात त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आली नाही, असं होत नाही. दादांकडून शाबासकीची थाप पाठीवर मिळायची त्यावेळी त्या थापेबरोबर अनेक सूचना मिळायच्या. त्या सूचनासुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना वाटायचं ही खरी शाबासकीची थाप आहे. कारण दादांनी रागावलं म्हणजे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट घडली, या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा”, असे भावुक झालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीकरांना म्हणाल्या.

उद्योगपतींसाठी गॅसची भाववाढ – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गॅस सिलिंडरच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. “सरकारने उद्योगपतींसाठी गॅसची भाववाढ केली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. त्यांनी ती भाववाढ मागे घ्यावी. देशाचे पंतप्रधान आज गायब झाले आहे. सिलिंडर जसं गायब आहे, त्याच प्रकारे नरेंदरही गायब आहेत. नरेंदर सरेंडर आहेत. सिलिंडर गायब झाल्याने भारत सरकारने वस्तुस्थिती स्वीकारावी. राष्ट्रभावनेतून या आपत्तीतून पुढे जाण्याचे प्रयत्न करावे. ट्रम्पच्या दबावात ते जेकाही करत आहेत त्याचा देखील आम्ही धिक्कार, निषेध करतो. लोकांच्या घरातील सिलिंडर संपले आहेत. सरकार काही बोलायला तयार नाही. या परिस्थितीत भाववाढ अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली आहे”, अशी टीका सपकाळ यांनी भाजपा सरकारवर केली.

सरकारला लोकांच्या पोटाची काळजी नाही – नाना पटोले

शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेली मुले जेवणाची व्यवस्था नसल्याने गावी परतत आहेत, सरकारला लोकांच्या पोटाची काळजी नाही, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. ते म्हणाले, “राज्य सरकार, केंद्र सरकार सपशेल खोटं बोलत आहे. त्यांना लोकांच्या पोटाची काळजी नाही. सामान्य लोकं, मध्यमवर्गीय लोकांचे मुलंमुली शहरात शिक्षणासाठी आले, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही म्हणून गावाकडे जावं लागतंय. हे सगळं सुरू असताना सगळं आलबेल आहे, असं दाखवण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जातोय. जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. एपस्टिन फाइलमुळे येथील व्यवस्था सरेंडर झाली आहे. आम्ही हा विषय सरकारसमोर मांडत आहोत. इराण, इस्रायल, अमेरिकेचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून आम्ही विधानसभेत प्रश्न मांडतोय, पण सरकार वस्तुस्थिती लपवतंय. मुंबई सारखी मोठी शहरं सगळी रिकामी होणार आहेत. तिथे खायला काही राहणार नाही. ही सगळी शहरं ओसाड पडणार. उद्या करोनापेक्षा भयंकर परिस्थिती देशात आणि राज्यात निर्माण होणार आहे.”