BJP vs NCP row Maharashtra : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याआधीच महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये राजकीय वाद उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपामध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर भाजपाने हिंदुत्ववादी विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या विधानाचा आधार घेऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वारशाचा दाखला दिला. यादरम्यान दोन्ही पक्षांमधील हा नेमका वाद कसा वाढत गेला? त्याविषयीचा हा आढावा…
भाजपाकडून सावरकरांच्या विधानाचा वापर
अजित पवारांकडून होत असलेल्या तीव्र टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा नेत्यांनी सावरकरांच्या प्रसिद्ध विधानाचा आधार घेतला. ‘तु्म्ही सोबत याल, तर तुमच्याबरोबर आणि नाही आलात, तर तुमच्याविना… विरोधात शिरला, तर विरोधात… आम्ही आमचे काम करीत राहू’, असे भाजपाच्या नेत्यांनी ठामपणे सांगितले. सावरकर यांनी १९३७ मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना हे विधान केले होते. त्यावेळी मुस्लीम लीगचे नेते बॅरिस्टर जीना यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध ताणले गेले होते. त्या वर्षी झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावरकर यांनी हे उदगार काढले होते. आता हेच वाक्य भाजपाने आपल्या मित्रपक्षासाठी वापरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सत्तेसाठी तडजोड नाही- भाजपाने ठणकावले
भारतीय जनता पार्टीने वीर सावरकरांना नेहमीच सर्वोच्च आदराचे स्थान दिले आहे. सत्ता आणि राजकारणासाठी आमच्या पक्षाने कधीही हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्या सूरात सूर मिसळत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही आपल्या मित्रपक्षांना स्पष्ट शब्दांत सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकर हेच आमचे वैचारिक प्रेरणास्थान असल्यामुळे आमच्यासोबत सत्तेत किंवा युतीत असणाऱ्या पक्षांनीही त्यांच्याविषयी तसाच आदरभाव ठेवावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे चव्हाण म्हणाले. या विधानाच्या माध्यमातून भाजपाने व्यापक वैचारिक मुद्द्यांवर मित्रपक्षांशीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.
अजित पवारांना अडचणीत आणण्याचा डाव?
भाजपाशासित सरकारच्या कामगिरी आणि विश्वासार्हतेवर मित्रपक्षांकडून होणारी तीव्र टीका शांतपणे सहन केली जाणार नसल्याचा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे. महायुतीतील मित्रपक्षांनी सावरकरांचा आदर केलाच पाहिजे, अशी भाजपाने घेतलेली भूमिका राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठीची एक चाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणारे मतदार मुस्लीम असल्याने सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून, अजित पवारांना अडचणीत आणण्याचा भाजपाचा हा डाव असल्याची कुजबुज राष्ट्रवादीच्या गोटात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीने दिला डॉ. आंबेडकरांचा दाखला
भाजपाच्या या आक्रमक पवित्र्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार अमोल मिटकरी यांनी ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. आपली विचारधारा इतरांवर लादण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाला कोणी दिला? लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपापला मार्ग व विचार निवडण्याचा स्वतंत्र अधिकार आहे, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले. यादरम्यान त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्टही शेअर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ विचारांशी बांधील आहे. जरी आम्ही भाजपाला अपेक्षित असलेली विचारधारा स्वीकारत नसलो तरी भाजपाला नाइलाजाने का होईना आमच्या पक्षाची आंबेडकरवादी विचारधारा स्वीकारावीच लागते आहे, असे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
‘सावरकर विरुद्ध आंबेडकर’ वाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे होते. समाजासाठी एकमेकांनी केलेल्या कार्याची दोन्ही नेत्यांना जाणीव होती. तरीदेखील जातीय व्यवस्था निर्मूलन व राष्ट्रनिर्मिती या प्रश्नांवर त्यांच्यात वैचारिक मतभेद होते. याच वैचारिक धाग्यावरून सध्या महायुतीतील दोन मित्रपक्षांत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येते. भाजपा आणि अजित पवार यांच्या पक्षांतील संबंध कमालीचे ताणले गेले असताना हा वाद आणखीनच उफाळून येण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी युती केल्याने भाजपाने आधीच नाराजी बोलून दाखवली होती.
हिंदूंच्या मतांसाठी भाजपाची रणनीती?
२०१७ ते २०२२ या कालावधीत भाजपाच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीकडून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे भाजपाची आणखीनच चिडचिड झाली आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पक्षाची रणनीती स्पष्ट केली. सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्यामागे आमचा एक स्पष्ट संकेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या पक्षांकडे जाणारी भाजपाविरोधी मते रोखण्याचा हा प्रयत्न आहे. सावरकरांच्या विचारांची मांडणी करून हिंदू मतदारांची मोट बांधण्यासाठी ही रणनीती आखली जाते, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
महायुतीत वादाची ठिणगी का पडली?
साधारणत: तीन वर्षांपूर्वी एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर भाजपाने फुटलेल्या गटांशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपाने आपली वैचारिक भूमिका आणि उद्दिष्टे पूर्णपणे बाजूला ठेवली. परंतु, आता सावरकरांचा मुद्दा उपस्थित करून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह बहुतांश महापालिकांमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची युती नसल्याने हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर भाजपाने आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव करून आपले संघटनात्मक जाळे उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावरील शाब्दिक हल्ल्यांना धार दिली आहे. राज्यात भाजपाचा प्रभाव आणखीनच वाढल्यास महायुतीतील मित्रपक्षांची राजकीय पकड आणि वाटाघाटीची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा : मोदींनी मौन बाळगल्यानेच भारताला टॅरिफचा फटका? अमेरिकन सचिवांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतील वादाचे मूळ कारण काय?
मराठी-मुस्लीम-दलित या मतपेढीला छेद देण्यासाठी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सावरकर आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटला जात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आंबेडकर यांच्या पक्षाने काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र होते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी त्यांच्यामधील मतभेद पूर्णपणे उघड झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर टीकेचा भडिमार केला आहे. भाजपाने हा अजेंडा केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आखलेला आहे. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात. आम्हाला सावरकर किंवा हिंदुत्वाबद्दल भाजपाच्या शिकवणीची गरज नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सावरकर विरुद्ध आंबेडकर हा वैचारिक वाद आता कोणत्या वळणावर जातो आणि याचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
