अकोला महानगरपालिकेत १६ नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. अशोक खरात प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींबाबत खळबळजनक विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते एकनाथ खडसे व त्यांच्या मुलीविरोधात फसवणुकीसह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मंत्र्यावर एका बॅनरमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी जाऊन रिक्षाचालकांनी गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महाराष्ट्रात घडलेल्या ५ महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घ्या.

‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणेमुळे १६ नगरसेवकांचे निलंबन?

अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत आज (सोमवारी) प्रचंड गोंधळ उडाला. वंचित आघाडीचे स्वीकृत सदस्य बोलण्यासाठी आल्यावर सभागृहात ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महापौरांनी १६ सदस्यांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. सभागृहात असभ्य वर्तन करून नियमभंग केल्याचा ठपका ठेऊन महापौर शारदा खेडकर यांनी १६ सदस्यांना तीन सभांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यामध्ये विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन, वंचित आघाडीचे गटनेते नीलेश देव, पराग गवई, मो. फजुल, आझाद खान, शेख शमशू कमर शेख, विजय इंगळे, शंकर लंगोटे, निलोफर खान, आकाश कवडे, अभय खुमकर, जैना बी, आर्शिया परविन, उज्ज्वला पातोडे, सुवर्णरेखा जाधव आणि जयश्री बहाद्दुरकर या नगरसेवकांचा समावेश आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींबाबत वडेट्टीवारांचे खळबळजनक विधान

अशोक खरात प्रकरणामुळे अनेक नेत्यांची नावे समोर येत असून वरिष्ठ अधिकारीही अशोक खरातच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, मंत्री, आमदार, शासकीय अधिकारी, आएएस, आयपीएस या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी सातत्याने म्हणतोय की अनेकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या बायका या खरातच्या ऑफिसमध्ये जात होत्या. प्रशासकीय अधिकारी बाहेर बसत अन् यांच्या बायका खरातच्या ऑफिसमध्ये जात असत .ते पुढे म्हणाले, नवीन प्रकरण आमच्यापुढे आले आहेत. हा खरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक-दुसऱ्यांच्या फॅमिली शेअर करायचा. किती खालचं आणि घाणेरडा प्रकार होता. महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणं, महाराष्ट्राची इभ्रत काढण्याचं हे प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, यापेक्षा दुर्दैवं काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी शारदा चौधरी यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. बाप-लेकीने भुसावळ तालुक्यात प्रस्तावित साखर कारखान्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रकरणात गैरप्रकार करुन फसवणूक केल्याची तक्रार एका मागासवर्गीय महिलेने केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात २००२ मध्ये सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली काही शेतजमिनींची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची शेतजमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. जमीन खरेदीच्या वेळी तायडे कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचे तसेच प्रस्तावित तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याच अनुषंगाने तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून ५१ हजार रुपये आगाऊ देखील मिळाले होते. त्यानंतर तायडे कुटुंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचा व्यवहारही पूर्ण करण्यात आला होता. मात्र, उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी तायडे कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना पूर्ण मोबदला देण्यात आला नाही.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमातील एका बॅनरवरील चुकीमुळे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. बॅनरवर स्व. अजित पवार आणि पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो वापरण्यात आलेला नाही, खासदार तटकरे यांना लक्ष केले जाऊ लागले. त्यानंतर अदिती तटकरे यांनी दिलगीरी व्यक्त केली. “अजितदादा असतील, सुनेत्राकाकी असतील यांचं आमच्या मनातील स्थान अढळ आहे. बॅनरवरील फोटोतून आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांची निष्ठा ठरवू नये. तरी, यानिमित्ताने एक बरे झाले- स्थानिक कार्यक्रमातील स्थानिक पातळीवर घडलेल्या एका चुकीचा मुद्दा बनवणारी यंत्रणा कशी काम करते हे आमच्या लक्षात आले. हा मुद्दा चवीने चघळणाऱ्यांना दादा हयात असताना त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल मनातून किती पश्चाताप व्यक्त करावा लागत असेल देव जाणे..! बाकी काकींना पक्षाच्या कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या चुकीबद्दल आमचे कान पकडण्याचा अधिकार आहेच”, असे स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी एक्स या समाजमाध्यमांवर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी रिक्षाचालकांची व्यथा

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी जाऊन गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हातावर पोट असलेल्या रिक्षावाल्यांकडे चार दिवसांपासून गॅस, इंधन नसल्याने संजय शिरसाट यांनी गॅस स्टेशनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. खासगी गॅस वितरक कंपन्या सरकारच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे त्या कंपन्यांनी गॅसचे दर वाढवले आहेत. महागड्या दरात गॅस स्टेशनचालक गॅस विकत घेत नाहीत. त्यामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान, एलपीजी, गॅस कंपन्या नागपूरच्या असल्याचे त्यांनी रिक्षाचालकांना सांगितले.