छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर – जालना स्थानिक संस्था मतदारसंघात एकूण ६६४ मतदानापैकी २७० हून अधिक सदस्य कमळ चिन्हावर निवडून आल्याचा भाजपचा दावा आहे. त्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ही जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नाहीत, असे सांगण्यात येते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागावाटपावर पेच निर्माण झाला आहे. परिणामी शिवसेनेला वगळून पुढे जावे, अशी मागणी आता भाजपचे नेते करू लागले आहेत.

भाजपला स्वबळावर छत्रपती संभाजीनगर – जालन्याची जागा जिंकण्यासाठी ३५ मतांची गरज पडू शकते. ही मते शिवसेनेशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून मिळतील, असा दावाही भाजपचे नेते करत आहेत. या मुळे ‘शिवसेने’ला बाजूला ठेवून ही निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवला आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक संस्था मतदारसंघाची जागा भाजपला सुटली तर ‘मलाही आमदार होता येईल’, असे वाटणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. राज्यसभेत उमेदवारी देताना नांदेडहून रामराव वडकुते यांना जशी ‘लॉटरी’ लागली तशी कोणालाही लागू शकते, हे माहीत असणाऱ्यांनी आपण कसे पक्षासाठी योग्य उमेदवार आहोत, असे सांगण्यास सुरुवात केली आहे.

मराठवाड्यातील मराठा – ओबीसी संघर्षात ‘लिंगायत’ समाजाचे प्रतिनिधीत्व असावे अशी नवी मांडणी सुरू करण्यात आली आहे. अशीच मांडणी धाराशिव व लातूर स्थानिक मतदारसंघातूनही होत आहे. या मतदारसंघात बसवराज पाटील यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अर्चना पाटील चाकुरकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बसवराज मंगरुळे यांनीही विधान परिषदेत उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे. डॉ. भागवत कराड, संजय केनेकर, किशोर शितोळे ही मंडळीही रांगेत उभी आहेत.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून जालना येथील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर इच्छुक आहेत. अभिमन्यू खोतकर हे युवासेनेने राज्य सचिव आहेत. मागील वेळी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून शिवसेनेचे विप्लव बजोरिया निवडून आले. त्यामुळे ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडेच ठेवावी असा आग्रह या पक्षातून धरण्यात आलेला आहे. नांदेड मतदारसंघात भाजपचा उमेदवार म्हणून अमरनाथ राजुकरकर यांच्यासह संजय कौडगे यांच्या नावाची चर्चा आहे. जागा वाटपाबरोबर विधान परिषदेतील उमेदवारीच्या नावावर आता चर्चा सुरू झाली आहे.