मुंबई : विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे एकेकाळी पारंपारिक बालेकिल्ले मानले जात असत. तेव्हा भाजपचे एकतर्फी वर्चस्व असायचे. सध्या सातपैकी फक्त कोकणात भाजपचा आमदार आता आहे. पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद घटली आहे. विधान परिषदेच्या एकूण ७८ जागांपैकी एक बारांश म्हणजेच सात सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. हेच प्रमाण शिक्षक मतदारसंघांसाठी आहे. अशा प्रकारे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतून प्रत्येकी सात असे एकूण १४ आमदार निवडून येतात. पदवीधर मतदारसंघ हे भाजपचे पारंपारिक बालेकिल्ले मानले जात असत. मुंबईतही भाजपचे आधी प्रस्थ होते. पण शिवसेनेचे प्रमोद नवलकर यांनी मुंबई पदवीधरमधील भाजपचे प्रस्थ मोडून काढीत तीन वेळा या मतदारसंघातून विजय संपादन केला होता.
कोकण, पुणे, नागपूर हे भाजपचे पारंपारिक बालेकिल्ले होते. तेव्हा भाजपच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार प्रत्येक वेळी रिंगणात असेलच असे चित्र नव्हते. पदवीधर मतदारसंघांत मतदार नोंदणीसाठी भाजप व संघ परिवाराची यंत्रणा पुढाकार घेत असे. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर नोंंदणी होत असे. गेल्या १० ते १५ वर्षांत सारे चित्र बदलले आहे. पदवीधरमधील भाजपचे वर्चस्व मोडीत निघाले. पदवीधरच्या तीन मतदारसंघांत झालेल्या निवडणुकात शरद पवार गटाचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. यामुळे सातपैकी फक्त कोकण मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे वगळता उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये विरोधकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आमदार आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी तर अमरावतीमध्ये काँग्रेसचेच धिरज लिंगाडे हे आमदार आहेत. नाशिकमध्ये अपक्ष सत्यजित तांबे, पुण्यात हर्षदा देशमुख – जाधव तर औरंगाबादमध्ये प्रतापसिंह पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निवडून आले आहेत. म्हणजेच सातपैकी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे प्रत्येकी दोन, भाजप, शिवसेना (ठाकरे ) व अपक्ष प्रत्येकी एक असे राजकीय चित्र आहे. पदवीधर या पारंपारिक वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपची चांगलीच पिछेहाट झाली आहे.
पदवीधर मतदारसंघांत मतदान नोंदणी महत्त्वाची असते. जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीत फायदा होतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदार नोंदणीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी पुढाकार घेतला असताना भाजपची ताकद कमी पडते. भाजपकडून पूर्वीच्या जोमाने मतदार नोंदणी होत नाही, अशी कबुली पक्षाच्या नेत्यांकडून दिली जाते. त्यातच मतदार नोंदणी करणाऱ्याला उमेदवारी मिळेलच याची खात्री नसते. याचा फटका यंदा पुण्यात बसल्याचे भाजपमध्ये बोलले जाते.
पदवीधर मतदारसंघांमध्ये आम्ही कमी पडलो. पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा विपरित परिणाम झाला. भविष्यात या चुका आम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. – नवनाथ बन, भाजपचे मुख्य प्रवक्ते
