चंद्रपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानाची गणिते वेगळी असतात, ही वस्तुस्थिती असली तरी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत मिळालेले मताधिक्य भाजपसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरले आहे. लोकसभेत दलित, मुस्लीम व कुणबी समाजाचे मतदान भाजपच्या विरोधात गेल्याने विधानसभेच्या रिंगणातील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. सुधीर मुनगंटीवार यांचा त्यांनी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होऊनदेखील मुनगंटीवार पराभूत झाले. मोदींविरोधातील नाराजी, सोबतच शेतकरी, दलित, मुस्लीम व कुणबी समाजाची गठ्ठामते धानोरकर यांच्याकडे वळली, ही त्यामागील मुख्य कारणे. लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक, निकालात निर्णायक भूमिका बजावणारी ही मते दुरावल्याने भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजप ५८ हजार ९०२ मतांनी मागे आहे. येथील विद्यमान आमदार किशोर जोरगेवार आता भाजपमध्ये गेल्याने त्यांचा पारंपरिक मतदार दुखावला आहे, सोबतच मुनगंटीवार समर्थकदेखील नाराज आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दलित, मुस्लीम व कुणबी मतदार त्यांच्या मागे उभा होता. मात्र, २०२४ मध्ये हा मतदार त्यांच्यासोबत राहील, याची शाश्वती नाही.
राजुरा मतदारसंघात भाजप ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी मागे आहे. त्यामुळे येथेही मतांची उणीव भरून काढण्यासाठी भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. येथे कोरपना व जिवती या दोन तालुक्यांतील आदिवासी समाजाची गठ्ठामतेही निर्णायक भूमिका बजावणार आहे.
हे ही वाचा… निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षप्रवेश, समर्थन अन् जेवणावळींना वेग
हे ही वाचा… राजुरा मतदारसंघात सत्तरीपार आजी-माजी आमदारांत लढत
बल्लारपूर मतदारसंघात २०१९ व २०२४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अनुक्रमे ३८ हजार व ४८ हजार मतांनी मागे होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी ३३ हजारांपेक्षा अधिक मतांनी येथे विजय मिळविला होता. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा गृह मतदारसंघ असलेल्या वरोरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत त्यांना ३७ हजारापेक्षा अधिक मताधिक्य होते. भाजप येथेही माघारली होती. यंदा कुणबी मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहे. लोकसभा निवडणुकीत चिमुर मतदारसंघातदेखील भाजप उमेदवार ३८ हजार मतांनी मागे होते. ब्रम्हपुरी मतदारसंघात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत ३० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी होती.