Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आता २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते विविध मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सध्या राज्यातील निवडणूक नेमकी कोणत्या मुद्यांनी गाजत आहे? निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे चर्चेत आहेत? अशा घडामोडी थोडक्यात जाणून घेऊयात.

खरं तर प्रत्येक निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. या निवडणुकीत देखील अगदी तशाच प्रकारे आरोप आणि प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या सभांना लाखोंची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनता नेमकी कोणाला कौल देते? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. आता ऐन निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे या योजनेची राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होत आहे. दुसरीकडे या योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई देखील पाहायला मिळते.

हेही वाचा : जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेतले मळभ दूर; एका पुतण्याला बळ, दुसऱ्याला कळ

तसेच एकनाथ शिंदे हे एकीकडे मराठा समाजाला आपल्या बाजूने ओळवण्यासाठी तशा पद्धतीचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसींचा मुद्दा मांडतानाही अनेकदा पाहायला मिळाले आहेत. तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात सध्या पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सभा घेत आहेत. मात्र, अजित पवार यांना मिळालेल्या मतदारसंघात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा टाळत असल्याचंही बोललं जात आहे. कारण यामागे काही कारणे आहेत. भाजपाच्या काही नेत्यांच्या विधानामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण परवडणारं नसल्यामुळे ते अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. याच बरोबर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका न करण्यासाठी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील तंबी दिली होती. याचं कारण म्हणजे शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निर्माण होऊन याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, याचा अंदाज त्यांना आला.

दुसरीकडे उद्धव ठाकरे हे या निवडणुकीच्या प्रचारात आपलीच खरी शिवसेना असा सांगत भारतीय जनता पक्षासह महायुती सरकारला टार्गेट करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबाबत ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूती होती, त्या प्रकारे आताच्या निवडणुकीत दिसत नाही. तसेच काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपापल्या भागात निवडणुकीकडे लक्ष घातलं असून काही ठिकाणी स्थानिक संघटनांनाही बरोबर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

यातच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या भाषणात बोलताना महाराष्ट्रात बदल घडवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असं सांगितलं. तसेच शरद पवारांनी बारामतीच्या निवडणुकीत देखील स्वत:हून लक्ष घातल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळ बारामतीत होत असलेल्या काका-पुतण्याच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारतं? याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आपल्या ससंदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिलेले आहेत. यातच महायुचीच्या सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेसह आणखी काही योजनांमुळे महाविकास आघाडीला काही प्रमाणात तोडा जाणवत असल्याचं मतही त्यांनी बोलून दाखवलं होतं.

मराठवाड्यात कसं आहे राजकीय समीकरण?

महाराष्ट्रात जात, धर्म, उमेदवार, पिकांच्या भावाबाबत शेतकऱ्यांची नाराजी, महागाई आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या अनेक स्थानिक समस्यांच्या अशा अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात निवडणूक फिरत आहे. दरम्यान, मराठवाड्याच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जास्त लक्ष दिल्याचंही दिसून येत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा चांगलाच तावून धरला आहे. महत्त्वाचं म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. मनोज जरंगे पाटील हे कायम आपल्या भाषणात बोलताना फडणवीसांना लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच मनोज जरंगे पाटील यांनी आधी आपण निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, नंतर निवडणुकीतून माघार घेत काही ठिकाणी उमेदवार पाडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या लढतीकडे अनेकाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार सत्तेत येईल हे सष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Story img Loader