बुलढाणा : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्ह्यातील सात विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळाल्याने महायुतीच्या गोटात उत्साह, जल्लोषाचे वातावरण आहे. याउलट महाविकास आघाडीत मात्र निरुत्साहाचे चित्र असून नेते वैफल्यग्रस्त दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने राज्यात महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली होती. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, पण भावी विधानसभा निवडणुकीत संभाव्य भरघोस यशाचा अतिआत्मविश्वासही निर्माण झाला. यातून जास्तीत जास्त जागा लाटण्यासाठी चढाओढ, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रंगलेला आणि गाजलेला राजकीय कलगीतुरा, लढतीत अनेक ठिकाणी ‘सांगली पॅटर्न’च्या नावाखाली बंडखोरी पाहवयास मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान आघाडीमधील सावळा गोंधळ कायम राहिला. याउलट लोकसभेतील पराभवावर चिंतन करून भाजप आणि मित्र पक्षाने त्यावर उपाययोजना केल्या आणि कामाला लागले. एकसंघ युती, जोडीला विकास कामे, लाखो लाडक्या बहिणी विरुद्ध असंघटित आघाडी आणि त्यातही बिघाडी, असे लढतीचे चित्र राहिले. यामुळे सातपैकी सहा जागा जिंकून महायुतीने निर्भेळ यश संपादन केले.
हे ही वाचा… बिगरमराठा मुख्यमंत्रीपदाबाबत शहांची तावडेंशी चर्चा
बुलढाणा आणि मेहकरमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध काँग्रेसमधील उघड नाराजी आणि बंडखोरी, मलकापूरमध्ये काँग्रेस नेत्याची बंडखोरी, काँग्रेसच्या वाट्यावरील चार मतदारसंघातील टोकाची गटबाजी, पाच ठिकाणी वंचितमुळे झालेले मतविभाजन, भाजपच्या ‘हरियाणा पॅटर्न’विरुद्ध पारंपरिक प्रचार, रणनीती, ही आघाडीच्या दारुण पराभवासाठी महत्त्वाची कारणे ठरली. मेहकरात ठाकरे गटाने विजय मिळविल्याने आघाडीचे ‘वस्त्रहरण’ झाले नाही, हाच आघाडीसाठी दिलासा ठरला.
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी आमदार राहुल बोन्द्रे, दिलीप सानंदा, राजेश एकडे, यांसारखे दिग्गज पराभूत झाले असताना निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयातून स्वेच्छानिवृत्ती घेणारे सिद्धार्थ खरात आमदार कसे झाले, याचेही आघाडीने चिंतन करणे गरजेचे आहे.
‘या’ नेत्यांवर चिंतनाची वेळ
ठाकरे गटाने दोन जागा लढवून मेहकरात विजय मिळवला आणि बुलढाण्यात ८४१ मतांनी पराभव स्वीकारला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज राजेंद्र शिंगणे तिरंगी लढतीत पराभूत झाले. यामुळे शरद पवार, राजेंद्र शिंगणे यांनी चिंतन करण्याची गरज आहे. जिल्ह्यावर वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसचा दारूण पराभव झाला. मुकुल वासनिक यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. त्यांना आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांना चिंतन करणे भाग आहे.
हे ही वाचा… मंत्र्यांच्या दालनांना अखेर कुलूप; मंत्रालयातील कारभार गुंडाळण्याचे आदेश
पुढाकार घेणार कोण?
एकाच वर्षात दोन मोठ्या निवडणुकांत मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागल्याने महाविकास आघाडीचे नेते चिंताग्रस्त आहेत. या पराभवाचे चिंतन करून त्यावर उपाययोजना आखणार का? आणि त्यासाठी पुढाकार घेणार कोण, असे प्रश्न निकालानिमित्त ऐरणीवर आले आहेत.
शिंदे गटालाही धक्का!
अर्थात चिंतनाला युतीतील शिंदे गट अपवाद आहे, असे नाही. मेहकरमधील धक्कादायक पराभवाने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांना निश्चितच आत्मचिंतन करावे लागणार आहे. प्रचंड विकासकामे करूनही निसटता विजय का मिळाला, यावर माजी आमदार संजय गायकवाड यांनाही चिंतन करणे गरजेचे आहे.