चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला तिकीट वाटपातील घोळ कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. क्षमता नसलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे कारणीभूत आहेत, असे आता काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारीच उघडपणे बोलत आहेत.
जिल्ह्यातील सहा जागांपैकी ब्रम्हपुरी ही एकमेव जागा काँग्रेसला वडेट्टीवार यांच्या रूपाने जिंकता आली. वरोरा मतदारसंघात खासदार धानोरकर यांचे लाडके भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली गेली. साधी ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची त्यांची क्षमता नसताना केवळ खासदाराचा लाडका भाऊ या एकमेव निकषावर उमेदवारी दिली गेली. मतदारांनी काकडेंना नाकारले. भावाच्या प्रचारात व्यस्त असल्याने खासदार धानोरकर इतर मतदारसंघांत प्रचारासाठी जाऊ शकल्या नाहीत.
हे ही वाचा… सांगली जिल्हा बॅकेंचे चार संचालक विधानसभेत पराभूत
बल्लारपूर मतदारसंघात भाजप नेते सुधीर मुनंटीवार यांच्या विरोधात ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे आवश्यक होते. मात्र डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी देण्याऐवजी हिंदी भाषिक संतोष सिंह रावत यांना काँग्रेसने संधी दिली. परिणामी गावतुरे यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका काँग्रेसला बसला. बल्लारपुरातून निवडणुकीची तयारी करणारे राजू झोडे यांना अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंंघात कार्यालय थाटण्यास सांगण्यात आले. निवडणुकीची तयारी करा, उमेदवारी तुम्हालाच, असा शब्दही झोडे यांना देण्यात आला. मात्र, ऐनवेळी दलित समाजाचे प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली गेली. पडवेकर यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात मतदारांची सहानुभूती मिळविली. मात्र, झोडे यांंच्या बंडखोरीने व पक्षाचे नेते घरात बसून राहिल्याने तसेच आर्थिक पाठबळ न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. राजुरा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या विरोधात नाराजी होती. त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठांना धोटे नको होते. त्याचा फटका धोटेंना आणि काँग्रेसला बसला.
उमेदवारीचा घोळ काँग्रेसमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. जिल्ह्यातील काँग्रेस नेते उमेदवार कोणताही असो, काँग्रेसला विजयी करायचे आहे, हा विचार करीत नाही, तोपर्यंत काँग्रेसला विजय संपादन करता येणार नाही, असे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता उघडपणे बोलत होते.