मुंबई : विधानसभेत सत्ताधाऱ्यांना प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे विरोधी बाकावर मोजकेच आमदार राहिले आहेत. या मोजक्या सदस्यांमध्ये मामा – भाच्याची जोडी सध्या लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) कैलास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे अभिजित पाटील यांचे सख्खे मामा आहेत. ही जोडी सरकारची प्रामुख्याने ग्रामीण भागांतील प्रश्नांवर कोंडी करताना दिसून येत आहे. शिवसेनेचे कैलास पाटील उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांची विधानसभेतील दुसरी टर्म आहे, त्यांचे भाचे अभिजीत पाटील पहिल्यांदाच माढा मतदारसंघातून निवडणूक आले आहेत. कैलास पाटील ग्रामीण भागांतील विविध प्रश्नांवर मुद्देसूद प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरत आहेत. ग्रामीण भागांतील प्रश्न मांडणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून चर्चेत आले आहेत.

चालू अधिवेशनात त्यांनी प्रामुख्याने शेती संदर्भात पिकविमा योजना, शेतीचे नुकसान, नुकसान भरपाई आदी विषयांवर प्रश्न विचारून कृषीमंत्र्यांना अडचणीत आणले होते. ‘महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो. पण, तुम्ही महाराष्ट्राला मामा बनवू नका,’ असे विधान करून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते.

अभिजीत पाटील सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण नेतृत्व आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अडचणीत आलेला कारखाना यशस्वीपणे चालविला आहे. त्यामुळे प्रामुख्याने सहकार, शेती, ग्रामविकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आदी विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे मुद्देसूद भाषण करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतात. ठेवीदारांच्या हितसंरक्षण (वित्तीय आस्थापना) अधिनियम, १९९९ (एमपीआयडी) मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करणाऱ्या विधेयकावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते. ‘अध्यक्ष महाराज, आमच्यावर अन्याय करू नका. आम्हाला बोलण्याची संधी द्या, आमचं ऐकून घ्या,’ असा आवाज आला की सभागृहाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते.