उमाकांत देशपांडे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आदींसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये वाद निर्माण झाले. राज्यपालांना हटविण्याच्या मागणीसह शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा शनिवारी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणातील होता, यासह ऐतिहासिक मुक्ताफळे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उधळल्याने भाजपची कुचंबणा झाली.

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
governor rule in delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी? नेत्यांच्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण; केजरीवालांच्या अटकेमुळे परिस्थिती चिघळणार?

भाजपला वादांनी घेरल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना कधी हटविले जाणार, याची चर्चा होत असली तरी वादांच्या मालिकांमुळेच त्यांची गच्छंती लांबली असून राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजप तह करणार का, हा प्रश्न आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाली असून राज्यपालपदाच्या कारकीर्दीलाही तीन वर्षे उलटली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यासह अन्य काही मुद्द्यांवर राज्यपालांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये वाद निर्माण झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेवरील बारा आमदारांच्या नियुक्त्यांसह त्यांच्या राजकीय भूमिकांवरूनही गदारोळ व वाद झाले. त्यामुळे राज्यपालांची कारकीर्दच वादांनी झाकोळली गेली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श होते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नवीन आदर्श आहेत, या त्यांच्या अजब तर्कटामुळे निर्माण झालेला वाद अजून शांत झालेला नाही.

हेही वाचा: शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक

वादांची मालिका निर्माण करणाऱ्या राज्यपालांना वास्तविक असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती. पण हा वाद निर्माण झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी राज्यपालांची पाठराखण केली नाही आणि वाद शमविण्याचा प्रयत्न केला. पण महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबरच छत्रपतींच्या घराण्यातील नेत्यांनीही राज्यपालांना हटविण्याची मागणी लावून धरल्याने भाजपची कोंडी झाली आहे. छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे आणि शिवेंद्र राजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे विरोधकांचे बळ वाढले आहे.

राज्यपालांना न हटविल्यास महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदसारखे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. पण काँग्रेसने बंदला विरोध केल्याने शनिवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांसह इतरांनीही राज्यपालांवर टीकेची झोड उठविणे कायम ठेवल्याने आणि त्यात प्रसाद लाड यांच्यासारख्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेल्या आपल्या ऐतिहासिक ज्ञानाची मुक्ताफळे उधळल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. आपल्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज व अन्य ऐतिहासिक व्यक्ती व संदर्भ यांचे किमान ज्ञान करून देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत चिंतन शिबीरे आयोजित करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

हेही वाचा: रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. राज्यपालांना हटविण्यासाठी विरोधकांकडून हा मुद्दा तापवत ठेवला जाईल, हे उघड आहे. गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर हे मुद्दे मागे पडतील, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पण ते होऊ नये, यासाठीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी भाजपनेही रणनीती तयार केली आहे. राज्यपालांना केंद्रातील वरिष्ठांकडून कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. सत्ता गेल्याने महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे विविध केंद्रीय व राज्य यंत्रणांमार्फत चौकशांचे शुक्लकाष्ठ लावण्यात आले आहे. तर शिवसेनेचा जीव असलेल्या महापालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी कॅगकडून करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये भाजपकडून आणखी राजकीय प्रतिहल्ल्यांची रणनीती आखण्यात येत आहे.

वास्तविक राज्यपाल कोश्यारी यांना दिवाळीपर्यंत सन्मानपूर्वक निरोप दिला गेला असता. राज्यपालांची तब्येत वृद्धापकाळामुळे नाजूक असल्याने आणि त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याने त्यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अनेकदा केली आहे. त्याचा विचार करून एव्हाना राज्यपाल जबाबदारीतून मुक्तही झाले असते. पण विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानामुळे राज्यपालांना हटविण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. त्यावरून राज्यपालांना हटविल्यास भाजपला ते राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.

हेही वाचा: Gujarat Election 2022 : …म्हणून गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका गावातील मुस्लिमांनी मतदानावर टाकला बहिष्कार

पुढील काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या लक्षात घेता राज्यपालांना लगेच हटविले, तर राज्यपालांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा विरोधकांचा मुद्दा मान्य केल्यासारखे होईल. त्यामुळे राजकीय कारणांमुळे निर्माण झालेल्या वादांच्या मालिकेमुळे राज्यपालांची पदमुक्ती लांबत चालली आहे. राजकीय वातावरण निवळल्यावर राज्यपालांच्या सन्मानपूर्वक निवृत्तीचा मार्ग लवकरच मोकळा करण्याचा विचार केला जाणार आहे. पण तोपर्यंत तरी चार पावले मागे जाऊन तहाची बोलणी करायची आणि वेळ मारून न्यायची, असे गनिमी काव्याचे धूर्त राजकारण भाजपचे वरिष्ठ नेते सध्या करीत आहेत.