बुलढाणा : महाविकास आघाडीत राज्य स्तरावर ‘मोठा भाऊ’ कोण यावरून वादंग उठला आहे. तिन्ही मित्र पक्षांत कलगीतुरा रंगला असतानाच दूरवरच्या बुलढाण्यातदेखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर तिन्ही मित्र पक्षांकडून आत्तापासूनच दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दुसरीकडे ‘मिशन-४५’ मध्ये समाविष्ट असलेल्या मतदारसंघावर भाजपनेही दावा केल्याने युतीतही सर्वच आलबेल नसल्याचे चित्र आहे. यामुळे नजीकच्या काळात बुलढाणा मतदारसंघावरून आघाडीच काय युतीतही वादंग, कलह निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. मतदारसंघाची रचना बदलत राहिली पण हे वर्चस्व कायम राहिले. प्रारंभी सर्व प्रवर्गांसाठी खुला असलेला हा मतदारसंघ १९७७ ते २००९ असा ३२ वर्षे अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. नव्वदीच्या दशकात भाजप-सेना युतीच्या उदयानंतर सक्षम पर्याय निर्माण झाला. २००९ पासून मतदारसंघ पुन्हा खुला झाला. यानंतर एकसंघ शिवसेनेने काँग्रेस आघाडीला गुलाल उधळण्याची संधीच दिली नाही. दरम्यानच्या काळात राजकीय पुलावरून धोधो पाणी वाहून गेले आणि पुलाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. महाविकास आघाडीत ठाकरे गट सहभागी झाला अन् त्यानंतर शिवसेनेत बंड होऊन शिंदेंच्या शिवसेनेचा उदय झाला. यामुळे जिल्ह्यातील राजकारणाचा बाज व स्वरूप बदलले आणि राजकीय अनिश्चितता निर्माण झाली.

हेही वाचा – भाजपच्या दोन देशमुखांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार ?

अनेक दशके काँगेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००९ मध्ये पक्षाने राष्ट्रवादीला सहज देऊन टाकला. मात्र, दोनदा राजेंद्र शिंगणे व एकदा माजी आमदार कृष्णराव इंगळे उमेदवार असताना पक्षाचा पराभव झाला. राष्ट्रवादीने १९९९ मध्ये अपयशी लढत दिली. हा राजकीय इतिहास असतानाही राष्ट्रवादीचा दावा यंदाही कायम आहे. पुन्हा एकदा राजेंद्र शिंगणे दोन हात करतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शरद पवारांनी ही जागा खेचून आणलीच तर ‘स्वाभिमानी’पासून सुरक्षित अंतरावर असलेले रविकांत तुपकर यांनी आघाडीच्यावतीने लढण्याची तयारी चालवली आहे. ‘मोठे साहेब’ व अजितदादा या दोघांशी त्यांची अलीकडे जवळीक व संवाद वाढला आहे. राजेंद्र शिंगणेंसोबतचे त्यांचे सख्य, एकनाथ खडसे यांची त्यांनी नुकतीच घेतलेली बंदद्वार भेट, त्यांनी जाहीर केलेला लोकसभा लढण्याचा निर्धार या शक्यतेची पुष्टी करणारी आहे. मात्र, यंदा बुलढाण्यासाठी आग्रही असलेली काँग्रेस यासाठी सहजासहसी तयार होणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

हेही वाचा – कर्नाटकचे सूत्र काँग्रेस राज्यातही राबविणार

बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश पदाधिकारी श्याम उमाळकर, जयश्री शेळके उमेदवारीसाठी इच्छुक व ‘तयार’ आहेत. शेळके यांचा बुलढाणा विधानसभेवर जोर आहे. मात्र, ऐनवेळी त्यांचा लोकसभेसाठी विचार होऊ शकतो, असे सध्याचे तरी चित्र आहे. काँगेसचे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल, संघटन, आजवरची कामगिरी लक्षात घेतली तर त्या निकषांवर का होईना, काँग्रेस आघाडीतला मोठा भाऊ ठरतो.

ठाकरे गटासाठी बुलढाणा केवळ मतदारसंघच नव्हे तर भावनिक विषय आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झालेल्या नेत्यांना जागा दाखवून द्यायचीच, अशा अटीतटीवर ‘मातोश्री’ आहे. यासाठी शिवसेनेच्या १९९६ पासूनच्या कामगिरीचे दाखले देण्यात येत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी आणि भाजपसोबत नसली तरी बुलढाण्यात आमचीच ताकद आहे, हा ठाकरे सेनेचा दावा आहे. ठाकरे पितापुत्रांसह अलीकडे सुषमा अंधारे यांनी घेतलेली सभा, खा. अरविंद सावंत यांचे नियमित दौरे लक्षात घेतले तर, ठाकरे सेना वाटाघाटीत बुलढाण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत आग्रही असेल, असेच दिसते आहे. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर तर उमेदवारी नक्की असल्यासारखे फिरत आहेत.

आघाडीप्रमाणेच युतीतही ‘मोठेपणा’चा गुंता आहे. खासदार प्रताप जाधव उमेदवारी नक्की समजून कामाला लागले असतानाच भाजपने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपच्या ‘मिशन-४५’मध्ये बुलढाण्याचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दोनदा जिल्ह्याचा दौरा केला. भाजपच्या गाभा समितीने जाधवांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगण्यात आले. भाजपकडे संजय कुटे, श्वेता महाले, आकाश फुंडकर हे विद्यमान आमदार आणि माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर व संदीप शेळके, असे इच्छुक व पर्याय उपलब्ध आहेत. गुंता क्लिष्ट झालाच तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे पर्याय म्हणून पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आहेत. यामुळे लोकसभा मतदारसंघात सध्या निर्माण झालेला (मोठा) ‘भाऊ’गिरीचा गुंता भविष्यात काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi and bjp claim for buldhana loksabha seat print politics news ssb
First published on: 01-06-2023 at 13:58 IST