मुंबई : उच्च न्यायालयाने बंदला मज्जाव केल्यानंतर शनिवारचा नियोजित ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यात येत असल्याचे महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी जाहीर करण्यात आले. मात्र, बदलापूरमधील विकृत घटनेवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास पुरेसा वेळ नसल्यानेच बंद मागे घेण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. ‘हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि, उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा नियोजित बंद मागे घ्यावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. उच्च न्यायालयाने बंद मागे घेण्याच्या आदेशात जी तत्परता दाखवली तशीच तत्परता बदलापूरमधील नराधमाला शिक्षा देण्यात दाखवावी, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.