मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघडीच्या वतीने उद्या, रविवारी महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहेत. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीचे नेते हुतात्मा स्मारक येथे जमणार आहेत. स्मारकाला वंदन करून आघाडीचे नेते, कार्यकर्ते व शिवप्रेमी ‘गेट वे ऑफ इंडिया’कडे जातील. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करतील.

हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड तसेच आघाडीच्या घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, आघाडीच्या आंदोलनाला भाजपने आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजप युवा मोर्चाच्या वतीने उद्या सकाळी ९ वाजल्यापासून राज्यभरात आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने या आंदोलनाला परवानगी नाकारली तरीही आंदोलन करण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत.