सांगली: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार प्रयत्न सुरू असून यामध्ये कळीची भूमिका शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. भाजप व महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी दावा केला जात असला तरी आकड्यांच्या खेळात कोण बाजी मारतो याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. उभय बाजूंनी चर्चेच्या फेर्‍या सुरू आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ६१ पैकी १६ जागा मिळाल्या आहेत. तर मित्र पक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या रयत क्रांती संघटनेला एक व जनसुराज्य शक्ती पक्षाला एक अशा १८ जागांचे संख्याबळ महायुतीकडे पर्यायाने भाजपच्या हाती आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या रयत क्रांतीच्या सदस्या आहेत, तर भाजपचे शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. या दोन्ही घटक पक्षांनी महायुतीतच आपण राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. भाजपचे १६ आणि मित्र पक्षाचे २ असे महायुतीचे संख्याबळ १८ होते. तर बहुमतासाठी ३१ सदस्यसंख्या गाठण्यासाठी अद्याप १३ सदस्यांची गरज आहे.

दुसर्‍या बाजूला १८ सदस्य निवडून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाने जिल्हा परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली होती. यामुळे आघाडीतील काँग्रेसचे ११ तर शिवसेना ठाकरे गटाचा एक सदस्य निवडून आला आहे. यामुळे आघाडीचे संख्याबळ ३० होत आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एका सदस्याची महाविकास आघाडीला गरज भासत आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना शिंदे पक्षाने ७ जागा जिंकल्या आहेत. या पक्षांनी पाठिंब्याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र समविचारी पक्षांना सोबत घेउन जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले असून याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ही निवडणूक भाजपविरोधात लढवली होती. राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे यांनी तर जनतेचा कौल भाजपविरोधी असून आपण आघाडीसोबत जाऊ शकतो असे सांगितले आहे, तर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी शिवसेनेशी आघाडी करून भाजपविरोधात निवडणूक लढवली आहे.

एकीकडे महाविकास आघाडीस अनुकूल स्थिती दिसत असताना भाजपने अध्यक्षपद महायुतीतील मित्र पक्षांना देण्याची तयारी दर्शवली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचाच अध्यक्ष होईल, याबाबत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना पंख लाभतात की सत्तेच्या बळावर डाव पालटतो याचा निर्णय मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत.