कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका निवडणुकीला गती आली असताना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मध्यवर्ती चौकात उभा करून त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होत आहे. त्यातही भाजपने यामध्ये आघाडी घेतली असताना महायुतीच्या मित्रपक्षांसह महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनाही या उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन शंभूप्रेमींची मनावर गारुड करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर घडामोडींना गती आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून प्रभाग निहाय उमेदवार निश्चितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणुकीसाठी कोणते मुद्दे प्रभावी ठरणार याचा गृहपाठ केला जात आहे.

इचलकरंजी शहरांमध्ये २००८ साली जातीय दंगल झाली होती. त्यानंतर इचलकरंजीत हिंदुत्वादाचे राजकीय वारे वाहू लागले. यातूनच भाजपचे सुरेश हाळवणकर हे दोनदा आमदार झाले. आता  भाजपकडून आमदार राहुल आवाडे हे विधिमंडळात पोहोचले आहेत. वस्त्रनगरीमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी या आधीचे आमदार, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न केला होता. त्यातून पुढे दिवंगत आमदार के. एल. मलाबादे मध्यवर्ती चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित झाले. त्यासाठी स्मारक समिती ठरवण्यात आली.

स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाराज गुरुजी, सहकाऱ्यांच्या  माध्यमातून सध्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याची तयारी जोरात सुरू आहेत. या निमित्ताने गेले आठवडाभर दररोज काही ना काही भव्य असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मुख्यमार्गाच्या दुतर्फा लांबलचक भगवी झालर पसरवलेली आहे. पुतळ्याच्या परिसरात भगवे वातावरण आहे.

स्मारक समितीच्या बरोबरीनेच आमदार राहुल आवाडे यांनी पुतळा अनावरणाचा सोहळा भव्यदिव्य व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्याचे नियोजन आहे. विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांची वेळ मिळवण्याचे प्रयत्न राहुल आवाडे यांनी सुरू केला आहे. येत्या सोमवारी पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. या माध्यमातून आमदार आवाडे यांनी इचलकरंजीतील तरुण पिढीला भाजपकडे आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.

पुतळ्याच्या निमित्ताने हजारो लोकांच्या जनसागर काही कार्यक्रमा वेळी दिसून आला. त्यातील तरुण पिढीला आकृष्ट करण्याचा प्रयत्न आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे. पुतळा अनावरणाचे श्रेय भाजप, आवडे यांच्याकडे जात असल्याने महायुतीतील काही मित्र पक्षांनीही वेगळे कार्यक्रम घेऊन या उपक्रमात आपलाही सहभाग असल्याचे दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने तोरण बांधण्याचा कार्यक्रम शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे यांच्या उपस्थितीत केला. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी पुतळा स्वागत कार्यक्रमाला उपस्थिती लावली. याशिवाय महाविकास आघाडीतील मदन कारंडे, सागर चाळके, उदयसिंह पाटील, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, संजय तेलनाडे आदींनी आवर्जून हजेरी लावत शंभूभक्तांच्या मनात घर केले.

भावनिक की वास्तव? इचलकरंजीतील नागरी प्रश्न हा स्वतंत्र चर्चेचा विषय बनला आहे. रस्ते, पाणी, कचरा उठाव आदी प्रश्न गंभीर बनले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी विविध पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेचे विषय झालेले स्थानिक प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार की सोहळ्याचे भावनिक मुद्दे निर्णायक ठरणार हे मतपेटी दाखवून देईल.